
मुंबई : राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात गुरुवारी हाणामारी झाली. त्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबंधितांना खडे बोल सुनावले आहेत. हाणामारीची चित्रफीत पाहून प्रश्न पडला की, काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची, मराठी जनतेने कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र, असे सवाल राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सत्ता हे साधन असावे, साध्य नाही, याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचे, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल, असे मी मानतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
स्वतःच्या लोकांवरही कारवाई करून दाखवा!
माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की, या भंपक प्रकरणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझे आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्यांना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका, असा इशाराही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला.
ते कोठे लपले आहेत?
आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसले आहेत, मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसले आहेत, जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला, तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो, याचा मला अभिमान आहे. कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही, तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असते. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता, तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून होता, पण यांचे काय, असेही त्यांनी म्हटले आहे.
...तर आश्चर्य वाटणार नाही!
भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही. अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी एका जुन्या अंदाजानुसार, अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे, महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे