"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, पण आधी.."; एक्स्प्रेस-वे कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले - "सरकारने टोल परत करावा"

रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी...
"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, पण आधी.."; एक्स्प्रेस-वे कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले - "सरकारने टोल परत करावा"
"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, पण आधी.."; एक्स्प्रेस-वे कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले - "सरकारने टोल परत करावा"
Published on

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तब्बल ३२ तास ठप्प राहिल्याने हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र या घटनेनंतर नेहमीप्रमाणे केवळ चौकशीचे आदेश देऊन सरकार मोकळे झाले, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर करत सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ५ वाजता गॅस टँकर उलटल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली, हे योग्यच होते. मात्र अशा दुर्घटना घडल्यानंतर कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडे ठोस कृती आराखडा होता का? हा खरा प्रश्न आहे.

एकच गोष्ट सातत्याने - ती म्हणजे टोल वसुली.

ते पुढे म्हणतात, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला हा द्रुतगती मार्ग आता २४ वर्षांचा झाला आहे. पण या काळात कोणत्या आपत्ती येऊ शकतात, आपत्कालीन व्यवस्थापन कसे असावे, यावर गांभीर्याने विचार झाला नाही. मात्र एकच गोष्ट सातत्याने आणि तत्परतेने झाली - ती म्हणजे टोल वसुली.

रस्ता बांधला आणि टोल घेतला, इतकीच सरकारची जबाबदारी?

मनसेचे टोल आंदोलन हे केवळ टोलविरोधात नव्हते, तर टोलच्या बदल्यात प्रवाशांना नेमक्या कोणत्या सुविधा दिल्या जातात, याबाबत होते, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. “रस्ता बांधला आणि टोल घेतला, इतकीच सरकारची जबाबदारी आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल...

परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा, असेही ते म्हणाले. अलीकडच्या काळात मुंबई–पुणे प्रवास किती वेळात होईल, याची कोणतीही शाश्वती उरलेली नाही, अशी खंत व्यक्त करत राज ठाकरे म्हणतात की, एकीकडे मुंबई आणि पुणे ही राज्याच्या व देशाच्या विकासाची इंजिने असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे या दोन शहरांमधील वाहतूक तब्बल ३२ तास ठप्प होते याकडे शांतपणे पाहायचे - हा कोडगेपणा अनाकलनीय आहे.

टोल परत द्या, चौकशीचा देखावा नको

या काळात ज्या प्रवाशांकडून टोल वसूल करण्यात आला, तो सरकारने परत केला पाहिजे, अशी ठाम मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच केवळ चौकशीचा फार्स न करता, भविष्यात अशा व इतर संभाव्य दुर्घटनांवर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो, याचा स्पष्ट कृती आराखडा तयार करून तो जनतेसमोर मांडावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.

‘पालकत्व असूनही नागरिक निराधार का?’

राज्यात पालकमंत्री असतात आणि सध्याच्या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतात, असे सांगत त्यांनी शेवटी सवाल केला की, इतकी पालकत्वाची भाषा करणारे सरकार असतानाही नागरिकांना निराधार वाटावे अशी परिस्थिती का निर्माण होते, याचा विचार सरकारने करावा.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटल्यानंतर ज्वलनशिल प्रोपलिन गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती. मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता, तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक वळवण्यात आली होती.  जवळपास २०-२५ किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महिला आणि मुलांसह प्रवासी, अन्न, पाणी किंवा शौचालयाच्या सुविधेविना अनेक तास आपल्या वाहनांमध्ये अडकून पडले होते. अखेर तब्बल ३३ तासांनंतर गुरूवारी पहाटे १.४६ च्या सुमारास अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अभूतपूर्व वाहतूक कोंडी फुटली.

logo
marathi.freepressjournal.in