विधानसभेला मनसे किती जागा लढवणार? राज ठाकरे म्हणाले....

उद्धव ठाकरेंना मराठी माणसानं मतदान केलं नाही, जनता मनसेची वाट पाहतीये, असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले.
राज ठाकरे
राज ठाकरे संग्रहीत छायाचित्र

मुंबई: लोकसभा निवडणूकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची मनसे विधानसभा निवडणूकीसाठी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आपण विधानसभेच्या २०० ते २२५ जागांवर आपण लढणार आहोत, विधासभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले. उद्धव ठाकरेंना मराठी माणसानं मतदान केलं नाही, जनता मनसेची वाट पाहतीये, असंही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, राज ठाकरे म्हणाले की, "आपण २०० ते २२५ जागांवर आपण लढणार आहोत, विधासभा निवडणुकीच्या तयारीला लागा. मी कुठल्याही पक्षाकडे जागा मागण्यासाठी जाणार नाही, कारण कुणाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये. त्यामुळं आपल्या पक्षाची भूमिका काय असायला हवी, हेच मी तुम्हाला सांगू शकतो," असं राज ठाकरे म्हणाले.

"लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या आघाडीला झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नाही. लोकांना उद्धव ठाकरेंचा राग आहे. मराठी माणूस आपण रिंगणात कधी उतरतोय, याची वाट पाहतोय. उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदीविरोधातील मतदान होतं, असंही राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाल्याचं समजतं. उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदान कसं झालं, हे सांगण्याचाही राज ठाकरेंनी प्रयत्न केला.

महायुतीतून लढल्यास कमी जागा मिळू शकतात...

विधानसभा जागावाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपकडे सध्या १०५ शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ४० तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे साधारणपणे ४० ते ४५ आमदार आहेत. त्यामुळं जागावाटपात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती मनसे जर महायुतीत आली, तर मनसेला किती जागा मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in