
मुंबई : मुंबई मराठी माणसाची हे फक्त ऐकिवात राहिले आहे. मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला जातोय, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र या, अशी भावनिक साद घालणारे बॅनर्स दादर येथील सेना भवनासमोर झळकले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असल्याचा बॅनर्स झळकला असून मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच.
राज ठाकरे शिवसेनेतून जेव्हा बाहेर पडले तेव्हा राज्यात मोठा भूकंप झाला होता. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापन केली. मात्र आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेक मराठी माणसांची इच्छा असून त्यासाठी त्यांना वेळोवेळी साद घातली जाते.
हीच भावनिक साद आता पुन्हा घालण्यात आली असून ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला एकत्रित फोटोही लावण्यात आला आहे. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असा उल्लेखही या बॅनर्सवर करण्यात आला आहे.