
मुंबई : इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याची सक्ती राज्य सरकारने केल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला मनसे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून, तर उद्धव ठाकरे गटाने ७ जुलै रोजी हुतात्मा चौक येथून मोर्चा काढण्याचे जाहीर केले असून या मोर्चात सर्वपक्षांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ठाकरे बंधू आक्रमक झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.
हिंदी भाषेची सक्ती करणार नाही, अशी कोणतीही भूमिका राज्य सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला मनसे आणि ठाकरे सेनेने जोरदार विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यात भाषिक आणीबाणी आहे, असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर पाचवीपासून हिंदी भाषा हा पर्याय असताना इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी भाषा सक्ती का, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातून मराठीपण घालवायचा हा कट आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
मराठी भाषा टिकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे असून ५ जुलैला मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेने ७ जुलैला मोर्चाची हाक दिली असून सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वसामान्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा ऐच्छिक असून पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी मौखिक शिकवणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. एकूणच हिंदी भाषा सक्ती नसली तरी अप्रत्यक्ष हिंदी भाषा लादण्याची महायुती सरकारची ही खेळी आहे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून मुंबई महापालिकेकडे सर्वपक्षीय नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच मराठीचा मुद्दा रेटत निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी मतपेरणी केली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राज्यात गाजत आहे. राज्य सरकारने हिंदी भाषेचा सुधारित ‘जीआर’ काढलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे विरोधकांनी स्पष्ट केले आहे.
भाजपचे ‘बाटेंगे आणि काटेंगे’ धोरण - उद्धव
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, राज्यात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, त्यामुळे सादरीकरणाची गरज नाही. हे दळण कशासाठी दळत आहात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, बटेंगे तो कटेंगे. आता ‘बाटेंगे आणि काटेंगे’ हे भाजपचे धोरण असावे. जे काही चांगले इतर भाषिकात आहे. त्यात मिठाचा खडा टाकला जात आहे. गद्दार जे मिंधेपणाने राहतात, त्यांना बाळासाहेबांचे विचार मराठीत सांगण्याची गरज आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. आम्ही कोणतीही सक्ती लादून घेणार नाही. आम्हाला सादरीकरण नको. आम्हाला हिंदी नकोच. हिंदी सर्वांना येते. कुणाला येत नाही. भाषेची जबरदस्ती खपवून घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीला दिला.
शिवसेनेचा जन्मच मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी झाला आहे. त्यामुळे यांना शिवसेना संपवायची आहे. कारण यांना महाराष्ट्रावर हुकूमशाही लादायची आहे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण याचा अर्थ कोणतीही भाषा आमच्यावर सक्तीने लादू देणार नाही. आम्ही दीपक पवार यांच्यासोबत आहोत. मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना त्यात सहभागी होणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. हिंदी सक्तीला मराठी भाषा अभ्यास केंद्राचा विरोध असल्याचे म्हणणे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ७ जुलैला मोर्चाची हाक दिली असून आम्ही त्यात सहभागी होणार असल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.
हिंदीला विरोध नाही, हिंदी सक्तीला विरोध आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला महाराष्ट्राने जोपासले. अनेक कलाकार मुंबईत आले आणि मोठे झाले. हिंदीचे वावडे नाही, पण ‘एक विधान, एक प्रधान’ ही सर्व एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आता ही भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
दरम्यान, राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी भेट घेत राज्य सरकारची बाजू मांडली. मात्र, भुसे यांची भूमिका फेटाळून लावल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. “खरंतर पाचवीनंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे. ‘सीबीएसई’च्या शाळा आल्या, त्या ‘आयएएस’ अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या आहेत. त्या शाळेचे वर्चस्व करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि महाराष्ट्र हे का करत आहे? बाकी राज्य काही अशी भूमिका घेत नाही. या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे, असेल आणि राहणार आहे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महायुती सरकारला खडसावले.
राज्य शासनाने हिंदीचा हट्ट सोडावा - शरद पवार
प्राथमिक शिक्षणात हिंदी नको. देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील, याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. त्यामुळे फडणवीस सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला.
ठाकरे बंधूंची मनोमिलनाकडे वाटचाल?
हिंदी सक्तीविरुद्ध मनसे व ठाकरे गटाने बाह्या सरसावल्याने राज व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन्ही पक्षांनी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने ठाकरे बंधूंमध्ये संभाव्य मनोमिलनाची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.
हिंदी शिकवणार मौखिक, पण तिसरी भाषा हिंदीच - भुसे
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० रोजी आले आहे, सर्व अभ्यास करून हे धोरण आले आहे. यातील काही गोष्टी या राज्यावर सोपवल्या आहेत. तिसरी भाषा सक्ती सरकारने केली नाही. तिसरी भाषा ही इयत्ता पहिली आणि दुसरीपर्यंत आहे. ती केवळ मौखिक शिक्षण असणार आहे. यात कोणतेही पुस्तक नसेल. तिसरीनंतर तिसऱ्या भाषेचे पुस्तक आहे. तिसरी भाषा म्हणून २० ते २५ भाषांचे पर्याय आहेत. त्यातून कोणतीही भाषा विद्यार्थी आणि पालक निवडू शकतात, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही - अमित शहा
हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे. हिंदी आणि इतर भारतीय भाषा मिळून आपल्या स्वाभिमान कार्यक्रमाला अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचवू शकतात. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अधिकाधिक भाषा विभागावर काम करत आहोत. २०४७ मध्ये ‘महान भारत’ विकसित होईल. यात भारतीय भाषांच्या विकासासाठी, समृद्धतेसाठी त्याचा वापर वाढेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
मोर्चा कुणाचा कुठून?
मनसे : ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून
ठाकरे शिवसेना : ७ जुलै रोजी हुतात्म्यांना अभिवादन करून सुरुवात