केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर अजित पवारांनी एका सभेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना, 'तुमच्यात धमक असेल तर नवीन पक्ष काढा, पण ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला तो का फोडताय' असा सवाल केला होता. तोच व्हिडिओ पोस्ट करत मनसेने अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का? वाह रे पट्ठ्या...!, अशी पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत मनसेने अजित पवारांना टोला हाणला आहे. त्यासोबत अजित पवारांच्या भाषणाचा व्हिडिओही जोडला आहे. या व्हिडिओमध्ये, "अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला...जो पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला...त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं...हा निर्णय जरी निवडणूक आयोगाने दिलेला असला तरी जनतेला पटलाय का...याचाही विचार झाला पाहिजे. अरे मग तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कोणी अडवलं होतं?" असे अजित पवार म्हणत आहेत. आता निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांच्या हातून देखील मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह गेल्यामुळे तोच धागा पकडत मनसेने अजित पवारांवर बोचरी टीका केली. त्याआधी, "बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते... असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !" असाही टोला मनसेने अजित पवारांना अजून एका पोस्टद्वारे लगावला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे शरद पवार यांच्या अडचणी यामुळे वाढणार आहेत. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार गटाने स्पष्ट केले आहे.