राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर; अमित ठाकरे यांनी मारहाण केली, मनसे पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा आरोप मनसेच्या मराठी कामगार सेनेचे महेश जाधव यांनी केला आहे.
राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर; अमित ठाकरे यांनी मारहाण केली, मनसे पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

नवी मुंबईतील खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर आज माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यावरून आता आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरूवात झाली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर आरोप केलाय. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे, कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा आरोप मनसेच्या मराठी कामगार सेनेचे महेश जाधव यांनी केला आहे.

काय म्हणाले महेश जाधव?

"मी महेश जाधव. मी कामगारांची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अमित ठाकरेंसारख्या माणसाला हे शोभत नाही. अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला त्यांना कामगारांचा तळतळाट लागले", असे महेश जाधव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणाले.

अमित ठाकरेंचा अपमान केल्याने कार्यकर्ते संतापले-

महेश जाधव यांनी केलेल्या आरोपांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "अमित ठाकरे यांच्याकडे महेश जाधवांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी महेश जाधव यांना जाब विचारण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी जाधवांनी त्यांना उलट सुलट उत्तरे दिली. त्यांनी ज्या शब्दात अमित ठाकरे यांच्याशी वाद घातला त्यावरून मनसे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना प्रसाद दिला."

महेश जाधव हे 20 वर्षांपासून राज ठाकरेंसोबत काम करत आहेत. गेल्या चार पाच वर्षांपासून ते अमित ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत, वेगवेगळ्या विषयांवर बैठकी घेतात. मग 20 वर्षानंतर त्यांना आता का जाणीव झाली. महेश जाधव यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत. महेश जाधवांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली, असेही ते देशपांडे म्हणाले.

दरम्यान, जाधव यांनी आरोप केल्यानंतर मनसेकडून याबाबत अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात मराठी कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in