एकाच कुटुंबातील ९ ठार, धुळ्यातील भाविकांवर काळाचा घाला; राजस्थानात भीषण अपघात, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश; ८ जखमी

राजस्थानमधील खाटूश्याम मंदिराच्या दर्शनासाठी गेलेल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील एकाच कुटुंबातील ९ जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश असून या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत.
एकाच कुटुंबातील ९ ठार, धुळ्यातील भाविकांवर काळाचा घाला; राजस्थानात भीषण अपघात, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश; ८ जखमी
एकाच कुटुंबातील ९ ठार, धुळ्यातील भाविकांवर काळाचा घाला; राजस्थानात भीषण अपघात, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश; ८ जखमी
Published on: 

धुळे : राजस्थानमधील खाटूश्याम मंदिराच्या दर्शनासाठी गेलेल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील एकाच कुटुंबातील ९ जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश असून या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्ग-५२ वर शनिवारी मध्यरात्री १ च्या सुमारास कोटा येथील नाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, शंभूपुरा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला भरधाव वेगातील ‘क्रूझर’ने जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूझरमधील आठ जण जागीच ठार झाले, तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतदेह आणि जखमी व्यक्ती गाडीच्या आत अडकले होते, ज्यांना अत्यंत कष्टाने बाहेर काढण्यात आले. जखमींना कोटा येथील 'न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले आहे. क्रूझर चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या अपघातात सज्जन पवार (६२) आणि त्यांची पत्नी उषा बाई पवार (६०), बाबूलाल पवार (७५) आणि त्यांची पत्नी सुशीला पवार (६२), त्यांचा मुलगा कैलास पवार (३५) आणि त्याची पत्नी अनिता पवार (३४), नात जान्हवी पवार (७), तसेच माधवी गणेश पवार (३२) आणि सान्वी पवार (३) यांचा मृत्यू झाला. सज्जन आणि बाबूलाल हे भाऊ होते. सान्वी ही सज्जन यांची नात होती, तर माधवी ही त्यांची सून होती. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये जगदीश कैलास पवार (१०), मयुरी शरद पवार (२०), मनीषा शरद पवार (४५), शरद पवार (४६), गणेश पवार (३०) आणि सृजित गणेश पवार (३) यांचा समावेश असून ट्रकचालक हारून (४३) हासुद्धा अपघातात जखमी झाला आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त करत म्हटले की, ‘कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुराजवळ झालेल्या रस्ते अपघातात प्राणहानी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याच्या आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमी व्यक्ती लवकर बरे व्हाव्यात, अशी मी प्रार्थना करतो’.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून सहवेदना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोटा येथील रस्ते अपघातात मृत झालेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘कोटा, राजस्थान येथे झालेल्या रस्ते अपघातात लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति मी मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करते. तसेच अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करते’, असे राष्ट्रपतींनी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोटा अपघातामधील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अपघाताचे कारण अस्पष्ट

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, दुर्घटनेबाबत पुढील अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील स्पष्ट होणार असल्याचे धुळे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. एसडीएम कपिल शर्मा यांनी सांगितले की, ‘सर्व व्यक्तींचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. कोटा प्रशासनाने या नऊ जणांना कोटा येथून महाराष्ट्रात नेण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे’. न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. आशुतोष शर्मा यांनी सांगितले की, ‘८ जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, माधवी गणेश पवार हिला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले’.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)