
पुण्यातील शिवाजी नगर जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यात राजीव साळुंखे यांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. या जंबो कोविड सेंटर घोटाळ्यात राजीव साळुंखे हे संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे भागीदार आहेत. पुणे शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी राजीव साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. आता संजय राऊत यांचे आणखी तीन साथीदार सुजित पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता आणि संजय शहा यांना अटक व्हायची आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बोगस कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आले होते. त्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याआधीच खासदार संजय राऊत यांचे साथीदार सुजित पाटकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. डॉ.हेमंत गुप्ता, संजय शहा आणि सुजित पाटकर अद्याप फरार असून त्यांना अटक करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. राजीव साळुंखे सुजित पाटकर हे लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये भागीदार आहेत. साळुंखे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीवर यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकल्यानंतरही तत्कालीन सरकारने संबंधित कंपनीवर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही वरळी मतदारसंघात लाईफ लाईन कंपनीला काम दिले. ब्लॅक लिस्टेड कंपनीला पुन्हा काम कसे देता येईल, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने बोगस कागदपत्रे दाखवून कोविड सेंटरचे कंत्राट मिळविल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.