Kolhapur : माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी लाक्षणिक उपोषण

नांदणी (ता. शिरोळ) मठाची परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या ‘माधुरी’ हत्तीच्या घरवापसीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २८ जुलै रोजी नांदणी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी करणार असून, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे.
माधुरी हत्तीणीचे संग्रहित छायाचित्र
माधुरी हत्तीणीचे संग्रहित छायाचित्र
Published on

कोल्हापूर / शिरोळ : नांदणी (ता. शिरोळ) मठाची परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या ‘माधुरी’ हत्तीच्या घरवापसीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २८ जुलै रोजी नांदणी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी करणार असून, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे.

संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पात माधुरी हत्तीला हलवून २८ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. उद्योगपतींच्या आग्रहाखातर नियम, कायदे आणि न्यायव्यवस्थेची पायमल्ली करून २८ जुलै २०२५ रोजी माधुरीला नांदणी मठातून हलविण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेमुळे मठाशी आणि हजारो भाविकांच्या श्रद्धेशी निगडित असलेल्या माधुरीच्या जाण्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.

माधुरीच्या घरवापसीसाठी मठाधिपती, ग्रामस्थ, भाविक आणि विविध संघटनांनी न्यायालयीन तसेच प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, राज्य शासन आणि उच्चाधिकार समितीने माधुरीला पूर्ववत नांदणी मठात परत पाठविण्याबाबत अनुकूल निर्णय दिला. मात्र, प्रशासकीय उदासीनता आणि दिरंगाईमुळे या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवार, २८ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नांदणी निशिधिका येथे ‘एक उपवास माधुरीच्या घरवापसीसाठी’ या संकल्पनेतून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात ग्रामस्थ, भाविक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून माधुरी हत्तीला नांदणी मठात सुखरूप परत आणावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in