‘शक्तीपीठ महामार्गाला आमचा ठाम विरोध’; शेतकऱ्यांचे लचके तोडू देणार नाही - राजू शेट्टी

विकासाच्या नावाखाली जर कोणी शेतकऱ्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांचेच लचके आम्ही तोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

सावंतवाडी : विकासाच्या नावाखाली जर कोणी शेतकऱ्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांचेच लचके आम्ही तोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

येथील काझी शहाबुद्दीन सभागृहात ‘शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती’च्या वतीने आयोजित वैचारिक परिषदेत ते बोलत होते. या वेळी शक्तिपीठ विरोधी राज्य समितीचे समन्वयक डॉ. गिरीश फोढे, कॉ. संपत देसाई, जिल्हा समन्वयक डॉ. जयेंद्र परुळेकर, माजी आमदार वैभव नाईक, काँग्रेस नेते इर्शाद शेख, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी, संचालक ‘गोकुळ’चे प्रकाश पाटील, नितीन पाटील, सतीश ललित, भगवान देसाई, संदीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.शेट्टी म्हणाले, पवनार ते पत्रादेवी असा सुमारे ८०६ किलोमीटर लांबीचा ‘शक्तीपीठ’ द्रुतगती महामार्ग हा मूठभर लोकांच्या हितासाठी राबविण्यात येणारा प्रकल्प आहे. या महामार्गामुळे शेतकरी आणि जमीनमालकांचे काहीच भले होणार नाही, उलट राज्य अधिक कर्जबाजारी होईल. नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे द्रुतगतीकरण करता आले असताना नव्याने वेगळा महामार्ग काढण्याची काहीही गरज नव्हती. या मागे राजकीय स्वार्थ आणि काही कंत्राटदारांचा आर्थिक फायदा दडलेला आहे. या प्रसंगी कॉ. देसाई, डॉ. फोढे आणि डॉ. परुळेकर यांनीही शक्तिपीठ महामार्गाविरोधात भाषणे करत प्रकल्पाच्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांवर तीव्र टीका केली.

धमक्यांना भीक घालू नये

हा महामार्ग म्हणजे विनाशाचा रस्ता आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागातील वन्यजीव, पिण्याचे पाणी आणि शेतीचे स्रोत धोक्यात येतील. मुसळधार पावसाच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि जमीनमालकांनी या प्रकल्पाला ठाम विरोध करावा. कोणी धमकावत असेल, तर त्या धमक्यांना भीक न घालता उभे राहा. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि १२ जिल्ह्यांतील शेतकरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असे आश्वसन त्यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in