राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, भाजपकडून चौथा उमेदवार नाही

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसने बुधवारी अधिकृत उमेदवारांची घोषणा केली.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, भाजपकडून चौथा उमेदवार नाही

प्रतिनिधी/मुंबई

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसने बुधवारी अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. भाजपने तीन उमेदवार दिल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची गुरुवारची शेवटची मुदत आहे. भाजपने ऐनवेळी चौथा उमेदवार रिंगणात उतरविल्यास चुरस वाढेल, पण सध्या तरी त्याची शक्यता कमीच आहे.

भाजपने अपेक्षेप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी मिळणार, हे निश्तिच होते. त्यानुसार भाजपने अशोक चव्हाण यांना पहिल्या क्रमांकाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपने कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन भाजपने कुलकर्णी यांची नाराजी ओढवून घेतली. राजकीय पुनर्वसन म्हणून मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभा उमेदवारी दिली आहे. भाजपने तिसरा उमेदवार म्हणून नांदेड जिल्ह्यातील डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. गोपछडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. भाजपच्या डॉक्टर आघाडीचे काम करणाऱ्या डॉ. गोपछडे यांना भाजपने २०२० च्या मे-जून विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली होती.

जून २०२२ च्या विधान परिषद निवडणुकीत पराभूत झालेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसने राज्यसभेसाठी संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हांडोरेंच्या निमित्ताने दलित चेहरा देत काँग्रेसने दलित समाजाला खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत हंडोरे यांचा पराभव झाला होता. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव काँग्रेस श्रेष्ठींच्या जिव्हारी लागला होता. हांडोरेंच्या पराभवाची दखल घेत काँग्रेसने पराभवाची चौकशी केली होती. आता काँग्रेसने हंडोरे यांना राज्यसभा देऊन त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. देवरा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून देवरा यांच्या उमेदवारीची चर्चा होती. सर्वात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार घोषित करण्यात आला. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राज्यसभेसाठी प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा केली.

भाजपकडून चौथा उमेदवार नाही

राज्यसभा निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार देणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभा निवडणूक १०० टक्के बिनविरोध होईल. कारण सर्वांकडे आपापला मतांचा कोटा आहे. सर्वांकडे जिंकून येण्याचा कोटा असेल तर चुरस निर्माण करून महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेण्याची गरज नाही. आम्ही चौथा उमेदवार देणार नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in