देवी-देवतांच्या राख्यांनी बाजार सजले; यंदा गणपती, ॐच्या राख्या खास आकर्षण

गेल्या काही वर्षांत सणासुदीचा ट्रेंड सतत बदलत आहे. काही वर्षांपूर्वी रक्षाबंधनच्या सणात देवी-देवतांच्या राख्यांना बहिणी पसंती देत होत्या. त्यानंतर काही काळ बॉलिवूडच्या कलाकारांचे फोटो असलेल्या राख्यांनी लोकांचे लक्ष वेधले होते. मात्र, यंदा पुन्हा एकदा देवीदेवतांच्या राख्यांनी बाजार सजले असून यंदा गणपती, ॐ असलेल्या राख्या खास आकर्षण ठरल्या आहेत.
देवी-देवतांच्या राख्यांनी बाजार सजले; यंदा गणपती, ॐच्या राख्या खास आकर्षण
Published on

गिरीश चित्रे/ पूनम पोळ/ मुंबई

गेल्या काही वर्षांत सणासुदीचा ट्रेंड सतत बदलत आहे. काही वर्षांपूर्वी रक्षाबंधनच्या सणात देवी-देवतांच्या राख्यांना बहिणी पसंती देत होत्या. त्यानंतर काही काळ बॉलिवूडच्या कलाकारांचे फोटो असलेल्या राख्यांनी लोकांचे लक्ष वेधले होते. मात्र, यंदा पुन्हा एकदा देवीदेवतांच्या राख्यांनी बाजार सजले असून यंदा गणपती, ॐ असलेल्या राख्या खास आकर्षण ठरल्या आहेत.

महागाई वाढत असली तरी रक्षाबंधनला भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी बाजारात बहिणींची एकच गर्दी होत आहे. गोंडा, धागा, डेटी राखी, स्टोन राखी बहिणींना आकर्षित करीत असून सिंगल पीस ४० रुपये ते ४८० रुपयांपर्यंत राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

महाराष्ट्रात साजरा होणारा रक्षाबंधन हा सण म्हणजे बंधू भगिनींच्या प्रेमाचे प्रतीक. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा हा सण महाराष्ट्रात पारंपरिक उत्साहात साजरा होतो. सध्या तो केवळ बहीण-भावाच्या नात्यापुरता मर्यादित न राहता, विविध सामाजिक उपक्रमांमधून बंधुत्व, संरक्षण व स्नेह भावना यांची जाणीव करून देतो. यंदा शनिवारी आलेल्या रक्षाबंधन सणासाठी सध्या बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असून कार्टूनच्या राख्या लहानग्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा देवी-देवतांचे फोटो असलेल्या सर्वाधिक राख्या बाजारात उपलब्ध असून एबीलाई राखीला विशेष मागणी आहे. ही राखी ३० रुपयाला एक असून राखीत नीळा खडा म्हणजे नजर लागत नाही, अशी लोकांची श्रद्धा आहे. अशा प्रकारच्या धागा, मेटलच्या विविध राख्या बाजारात उपलब्ध आहेत. धाग्याच्या राख्या ३० रुपये ते ३०० रुपये डझन या रेंजमध्ये उपलब्ध असल्याचे मस्जिद बंदर स्टेशनजवळील गोमुख भवन येथील ‘रामफळ टॉईज’ या दुकानाचे मालक अक्षय यांनी सांगितले.

ऑनलाईनचा फटका

सध्या ऑनलाईनचा जमाना असून राख्यांसाठीही ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड वाढला आहे. ऑनलाईन शॉपिंग सुरू झाल्याने दुकानातील राखी विक्रीला फटका बसल्याचे काही राखी विक्रेत्यांनी सांगितले.

‘कपल’ राखीला अधिक मागणी

गुजराती आणि राजस्थानी समाजामध्ये भावासोबत भावाच्या बायकोलाही राखी बांधण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा महाराष्ट्रीयन ग्राहकांपासून अन्य जातीचे ग्राहकही या राखीची मागणी करत आहेत. या कॉम्बो राखीची किंमत १२० रुपयांसून सुरू होऊन ३०० रुपयांपर्यंत आहे.

लहानमुलांसाठी झगमगणाऱ्या लाईटची राखी

लहान मुलांनी मनगटावर निदान १ तास तरी राखी ठेवावी. यासाठी यंदा बाजारात झगमगणाऱ्या लाईटच्या राख्या आल्या आहेत. या राख्यांमध्ये छोटा भीम, छोटा वाघ, हत्तीची सोंड असे डिझाईन आहेत. तर या राख्यांसोबत पेन्सिल आणि पट्टी फ्री मिळत असल्याने ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. या राख्यांची किंमत केवळ ३० ते ६० रुपये असल्याने ग्राहक खूप उत्साहाने या राख्या घेत आहेत, असे भुलेश्वर येथील राम नानजी या विक्रेत्याने सांगितले.

पोस्टातून अडीच-तीन लाख राख्या रवाना

भारतीय डाक सेना जनसेवेच्या माध्यमातून मुंबईतील २०० डाकघरातून आतापर्यंत अडीच ते तीन लाख राख्या राज्य तसेच राज्याच्या बाहेर पाठवण्यात आल्या आहेत. अनेक भगिनी मागील १५ दिवसांपासून राखी पोस्ट करण्यास येत आहेत. तर गेल्या ३ ते ४ दिवसांपासून अनेक भगिनी राखी स्पीड पोस्ट करत आहेत. जेणेकरून रक्षाबंधनपर्यंत भावाला राखी मिळेल आणि सण साजरा करता येईल, अशी माहिती भारतीय डाक सेना जन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच मागील आठवडाभरापासून आतापर्यंत १० ते २० हजाराहून अधिक राख्यांचे पार्सल स्पीडपोस्टच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात पोहोचले असल्याची माहिती ‘स्पीड पोस्ट’ या कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

चांदीच्या राख्यांना पसंती

सोने-चांदीचा भाव दिवसेंदिवस नवनवे विक्रम करत आहे. तरीही ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी दुकानांमध्ये रीघ लागत आहे. रक्षाबंधननिमित्त ज्वेलर्सची दुकाने सोने-चांदीच्या राखी विक्रीसाठी सज्ज झाली आहेत. वामन हरी पेठे ज्वेलर्सकडे चांदीच्या राखीचे दर ५०० रुपयांपासून ५ हजारपर्यंत आहेत. या ठिकाणी ॐ आणि गणेशमूर्ती असलेल्या राख्यांना अधिक पसंती आहे. तर पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या गार्गी कलेक्शनमध्ये राख्या ३०० रुपयांपासून २ ते ३ हजारापर्यंत आहेत. तसेच या राख्यांवर २५ टक्के सूट असल्याने यंदा या राख्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी गणपती, ओम, कृष्ण, वीरा, मंडाला तसेच, लहानग्यांसाठी छोटा भीम, बालगणेश, सिंबासारख्या राख्यांना अधिक मागणी असल्याची माहिती पु. ना. गाडगीळ दुकानात काम करणाऱ्या शिल्पा यांनी दिली.

‘राजमुद्रा’ राखीला विशेष पसंती

यंदा मराठीचा मुद्दा गाजत असतानाच बहिणी भावांना रक्षाबंधनाच्या दिवशी ‘राजमुद्रा’ राखी बांधण्यासाठी विशेष उत्सुक आहेत. ‘राजमुद्रा’ ही राखी भावाच्या मनगटावर शोभून दिसेल आणि त्याला ती नक्की आवडेल. अशी प्रतिक्रिया शामल जोशी या भगिनीने दिली. या सिल्व्हर राखीची किंमत ७० रुपये, तर गोल्डन राखीची किंमत ८० रुपये आहे. मागील ४ दिवसांपासून या प्रकारच्या किमान ४ ते ५ हजार राख्या विकल्याची माहिती दादर येथील सुहास भेंडे या विक्रेत्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in