मुंबई/नागपूर : विधानपरिषदेच्या १९ व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रा. राम शिंदे यांना सभापतीच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेऊन गेले.
विधानपरिषदेच्या सभापतीपदी विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे व शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्यास सदस्य मनीषा कायंदे, सदस्य अमोल मिटकरी व सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला.
महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ; अंबादास दानवेंचे आश्वासन
महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला साजेशा व्यक्तिमत्त्वाची निवड विधान परिषदेचे सभापती करण्यावर सर्वांनी एकमत केले. विरोधी पक्षानेही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आपली कारकीर्द येणाऱ्या काळात चांगली व राज्याच्या प्रगतीची जावो, अशा शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी नवनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांना आपल्या स्वागतपर भाषणात दिले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज आहात. तुम्ही या सर्वोच्च पदी बसल्याचा सर्वात जास्त आनंद तुमच्या माऊलीला होत असेल असे म्हणत दानवे यांनी सभागृहात बसलेल्या शिंदे यांच्या आईचे स्वागत केले. अंबादास दानवे यांनी प्रा. राम शिंदे यांच्या राजकिय कारकीर्दीवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.
तसेच जलयुक्त शिवार योजनेत मंत्री झाल्यावर केलेल्या कामाचे कौतुक केले. आपल्या कामात आमचे पूर्ण सहकार्य राहील. सभागृहात डाव्या बाजूला बसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांवर जास्त लक्ष ठेवा,अशी सूचना दानवे यांनी सभापती यांना केली.