लेकींच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी दौड; रमाबाईंनी जिंकली 'अमृत दौड'! साडीचा पदर सांभाळत, हातात स्लीपर घेऊन धावल्या

संसाराचा गाडा ओढण्यासाठी रोज कष्ट करणाऱ्या एका आईने आपल्या दोन मुलींच्या भवितव्यासाठी चक्क धावण्याच्या मैदानात उतरून विजय मिळवला. अंगावर साधी साडी, पायात साधी स्लीपर आणि सोबत कोणतेही विशेष प्रशिक्षण नाही, असे असतानाही ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी तरुण धावपटूंना मागे टाकत अंबाजोगाई येथे आयोजित ‘अमृत दौड’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
लेकींच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी दौड; रमाबाईंनी जिंकली 'अमृत दौड'! साडीचा पदर सांभाळत, हातात स्लीपर घेऊन धावल्या
लेकींच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी दौड; रमाबाईंनी जिंकली 'अमृत दौड'! साडीचा पदर सांभाळत, हातात स्लीपर घेऊन धावल्या X| Rohit Pawar
Published on

सुजित ताजणे/अंबाजोगाई

संसाराचा गाडा ओढण्यासाठी रोज कष्ट करणाऱ्या एका आईने आपल्या दोन मुलींच्या भवितव्यासाठी चक्क धावण्याच्या मैदानात उतरून विजय मिळवला. अंगावर साधी साडी, पायात साधी स्लीपर आणि सोबत कोणतेही विशेष प्रशिक्षण नाही, असे असतानाही ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी तरुण धावपटूंना मागे टाकत अंबाजोगाई येथे आयोजित ‘अमृत दौड’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे धावताना पायातील स्लीपर निसटू लागल्याने त्यांनी दोन्ही स्लीपर हातात घेतल्या आणि पावसाने गार झालेल्या रस्त्यावर अनवाणी पायांनी धावत अंतिम रेषा गाठली. त्यांच्या या जिद्दीचे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू तरळले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अंबाजोगाई शहरात ‘अमृत दौड’चे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून संत भगवानबाबा चौकाच्या दिशेने झालेल्या या खुल्या धावण्याच्या स्पर्धेत शेकडो तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक युवक-युवती या स्पर्धेत सहभागी झाले होते.

नियमित सराव, धावण्यासाठी आवश्यक पोशाख आणि पायात चांगले बूट अशा तयारीनिशी आलेल्या या तरुणांमध्ये रमाबाई मात्र अगदी साध्या वेशात उभ्या होत्या. 

सरकारचा पुढाकार

रमाबाई रणवीर यांच्या मदतीसाठी शासन पुढे सरसावले असून त्यांच्या मुलींच्या शिक्षणाची आणि कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी शासन उचलेल, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी जाहीर केले. त्यांची एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत आहे तर दुसरी मुलगी बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतरत्र स्वयंपाक करण्याचे काम करतात.

'संसारासाठी रोज धावते; आज मुलींसाठी धावले!’

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना रमाबाईंनी व्यक्त केलेली भावना उपस्थितांच्या काळजाला भिडली. संसारासाठी रोज धावपळ करते; आज मुलींसाठी धावले, अशा आशयाचे त्यांचे शब्द ऐकून उपस्थित भारावून गेले. त्यांच्यासाठी ही केवळ धावण्याची स्पर्धा नव्हती. ही त्यांच्या आयुष्याचीच एक शर्यत होती. ‘अमृत दौड’च्या मैदानावर त्यांची धाव ही केवळ काही किलोमीटरची नव्हती; ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या संघर्षाची धाव होती.

पतीच्या निधनानंतर मुलींची जबाबदारी

पतीच्या निधनानंतर त्यांच्या खांद्यावर दोन मुलींच्या संगोपनाची आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आली. त्यांनी हिंगोली सोडून अंबाजोगाई येथे येण्याचा निर्णय घेतला. येथे त्या विविध ठिकाणी स्वयंपाकाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आजही त्यांचा दिवस कष्टानेच सुरू होतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in