रामदास आठवलेंची नाराजी दूर; रालोआचे स्टार प्रचारक

रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार रामदास आठवले येत्या ४ एप्रिलपासून देशभर दौरा सुरू करतील. त्याची सुरुवात कन्याकुमारीपासून सुरू होणार असून, ४ एप्रिलला ते तामिळनाडूत कन्याकुमारी येथे प्रचार दौऱ्यावर रवाना होत आहेत.
रामदास आठवलेंची नाराजी दूर; रालोआचे स्टार प्रचारक

प्रतिनिधी/मुंबई

रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सुरुवातीला शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही होते; मात्र आता रामदास आठवले यांची नाराजी दूर झाली असून, लवकरच ते रालोआच्या प्रचाराच्या रणधुमाळीत सामील होणार आहेत. रालोआतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत आठवले यांचा नावाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या ४ एप्रिलपासून रामदास आठवले हे प्रचारास सुरुवात करणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार रामदास आठवले येत्या ४ एप्रिलपासून देशभर दौरा सुरू करतील. त्याची सुरुवात कन्याकुमारीपासून सुरू होणार असून, ४ एप्रिलला ते तामिळनाडूत कन्याकुमारी येथे प्रचार दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्यानंतर ५ एप्रिल रोजी उत्तराखंडमधील डेहराडून येथे रामदास आठवले भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. तर ६ एप्रिल रोजी पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचार सभांना रामदास आठवले संबोधित करणार आहेत. त्यानंतर आसाममध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. हा दौरा पूर्ण झाल्यानंतर १० एप्रिलला मणिपूर येथे प्रचार दौरा करणार आहेत.

महाराष्ट्रातही प्रचार दौरा

महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे त्यानंतर १३ एप्रिलला भंडारा गोंदिया, रामटेक आणि नागपूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार रामदास आठवले करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित १४ एप्रिलला सकाळी संसदभवनात आयोजित कार्यक्रमात रामदास आठवले उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ते मुंबईत चैत्यभूमी येथे भीम जयंतीनिमित्त अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in