
मुंबई : ‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम मुले-मुली एकत्र आले, की त्यास असे म्हणणे योग्य नाही. दलित-सवर्णसुद्धा एकत्र येतात. मुले-मुली एकत्र येतात, अशी लग्न होतात. हिंदू-मुस्लिम लग्न झाले, की त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणणे चुकीचे आहे. मी याला सहमत नाही. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
जातीय सलोख्याबाबत बोलताना आठवले म्हणाले की, जातीय सलोखा न बिघडवता योग्य भूमिका असावी. मोदी सर्वांना समान मानतात. त्यांनी सर्वांसाठी योजना आणल्या. त्याचा मुस्लिम समाजालाही फायदा होतो. मोदी सरकार अतिरेकी मुस्लिमांच्या विरोधात आहे. ते मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. मुले, मुली एकत्र आले आणि सहमतीने लग्न झाले, तर त्यात वावगे काय, असेही आठवले म्हणाले.
आगामी पालिका निवडणुकीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा मिळतील. जागा दिल्या नाही, तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही. मंत्रिपदाची अपेक्षा होती. किमान महामंडळे तरी मिळावीत, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.