ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रत्नागिरीच्या (Ratnagiri) खेडमध्ये सभा घेणार आहेत. हा भाग म्हणजे शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला मानला जातो. उद्धव ठाकरेंच्या सभेवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, "रामदास कदमांच्या किती धसका घेतलाय, हे कळून येतं" असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी मला आणि माझ्या मुलाला कायमचे संपवायचे प्रयत्न केले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, "उद्धव ठाकरे येणार म्हणून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून जनता आणण्याची मोठी तयारी सुरु आहे. जणू खेडमध्ये शिवाजी पार्कमध्ये भरणाऱ्या दसरा मेळाव्याची जाहीर सभाच आहे. सभेसाठी बाहेरून लोक आणले जात असून यावरून रामदास कदम या नावाचा किती धसका घेतला आहे, हे स्पष्ट होत आहे." असा टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, "या सभेसाठी २ - ४ टक्के तरी स्थानिक लोक आहेत का?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, "याला उत्तर १९ मार्चला त्याच मैदाणावर व्याजासहित देणार," असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते संजय कदम हे या सभेत ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या सभेआधी संजय कदम यांनी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, "त्यांनी आमच्यावर लावलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर त्यांच्यावर मानहानीचा खटला करणार आहोत," असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच, रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे पहिले नेते असतील ज्यांनी आपल्या पक्षातील आमदाराला संपवले आणि दुसऱ्या पक्षातील भाड्याने विकत घेतले. हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधीच केले नव्हते." अशी टीका त्यांनी यावेळी केली.