
मुंबई : महायुतीचे सरकार कधीच लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, अशी घोषणा घटक पक्षांतील तिन्ही प्रमुख नेत्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीतील तिन्ही पक्ष लाडक्या बहिणींना खूश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता ‘लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील’, असे वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केले आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट झाला आहे, ही विरोधकांची बोंब आता रामदास कदम यांच्या विधानामुळे सत्य होती, हे स्पष्ट होत आहे.
इतकेच नाहीतर बजेट डोळ्यासमोर ठेऊन सगळ्या योजना चालू कराव्या लागतात. अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात. आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिले, तर ३० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते, असेही रामदास कदम म्हणाले.
यदांच्या आर्थिक वर्षामध्ये एका महिला बालकल्याण विभागासाठी ३१,९०७ कोटी इतका निधी दिला गेला असून ही वाढ लाडक्या बहिणीमुळे झाली आहे. यानंतर उर्जा विभागासाठी २१,५३४ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १९,०७९ कोटी शालेय विभागासाठी २९०० कोटी उच्च शिक्षणासाठी ८१० कोटी आणि पाच कोटी इतकी सर्वात कमी रक्कम ही दुग्धविकास विभागासाठी देण्यात आली आहे.