ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला अडचण नाही! काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भूमिका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय होऊ शकतो किंवा होऊ शकणार नाही. महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ. मात्र, ठाकरे बंधु एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. मात्र, सध्या राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आपली भूमिका मांडली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय होऊ शकतो किंवा होऊ शकणार नाही. महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ. मात्र, उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. मात्र, सध्या राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आपली भूमिका मांडली.

“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीची काही चर्चा झाली असेल तर त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. दोन्ही भाऊ हात मिळवत असतील तर आम्हाला त्यात काही अडचण नाही. परंतु, महाविकास आघाडीसंदर्भात आम्ही यावर राजकीय दृष्टीने आमच्या बैठकीत सविस्तर चर्चा करू,” असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवासी कार्यशाळा पुण्यात पार पडली. या कार्यशाळेला चेन्नीथला यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, नसीम खान, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी मात्र या कार्यशाळेकडे पाठ फिरवली.

“जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत देशात स्वातंत्र्य राहणार नाही. विधानसभा निवडणुकांबाबत सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्याने आवाज उठवला होता. मतांची चोरी होत आहे, मतांच्या यादीत घोळ करून महाराष्ट्र आणि हरियाणामधील सत्ता भाजपने घेतली. त्यामुळे मोदी-शहा असेपर्यंत देशात मोकळ्या किंवा भीतीमुक्त निवडणुका होणार नाहीत,” अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

निवडणूक आयोग भाजपच्या हातात

निवडणूक आयोग भाजपच्या हातात आहे, ते म्हणतील तसेच होईल. देशाचे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी राहुल गांधी लढत आहेत. मात्र, निवडणूक आयोग त्यांना उत्तर देत नाही. देशाचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरल्याने अमेरिका आपल्याला धमकी देते. काँग्रेस काळात कधी कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष अशी धमकी देत नव्हते, त्यांना उत्तर दिले जात होते, असेही चेन्नीथला म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in