तिरंगी लढतीत बाजी कोणाची? महायुतीचे राजू पारवे, काँग्रेस श्याम बर्वे व अपक्ष किशोर गजभिये यांच्यात लढत

लोकसभेच्या या मतदारसंघात २० लाख ४७ हजाराच्या आसपास मतदार आहेत. या मतदारसंघातून सध्या २८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र खरी लढत होणार आहे ती शिंदे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे राजू पारवे, काँग्रेसचे म्हणजेच महाआघाडीचे श्याम बर्वे आणि अपक्ष किशोर गजभिये यांच्यात.
तिरंगी लढतीत बाजी कोणाची? महायुतीचे राजू पारवे, काँग्रेस श्याम बर्वे व अपक्ष किशोर गजभिये यांच्यात लढत

अविनाश पाठक

नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेलेला मतदारसंघ आहे. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ रामटेक, उमरेड, कामठी, सावनेर, काटोल आणि कमळेश्वर या सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागला गेला आहे. सहापैकी तीन मतदारसंघ महाआघाडीकडे, तर तीन मतदारसंघ महायुतीकडे आहेत.

लोकसभेच्या या मतदारसंघात २० लाख ४७ हजाराच्या आसपास मतदार आहेत. या मतदारसंघातून सध्या २८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र खरी लढत होणार आहे ती शिंदे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे राजू पारवे, काँग्रेसचे म्हणजेच महाआघाडीचे श्याम बर्वे आणि अपक्ष किशोर गजभिये यांच्यात. किशोर गजभिये हे निवृत्त सनदी अधिकारी व मूळचे काँग्रेसचे असून त्यांनी २०१९ ची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती. त्यांनी तेव्हा ४ लाख ७० हजारांच्या आसपास मते घेतली होती. आता त्यांना वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे.

सध्या शिवसेना शिंदे गटात आलेले राजू पारवे हे मूळचे काँग्रेसचेच, त्यांनी २०१९ मध्ये उमरेड विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. दरम्यान, काँग्रेस सोडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. यावेळी शिंदे शिवसेनेने त्यांना उमेदवारी देण्याचे मान्य केल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

राजू पारवे यांना महायुतीने उमेदवारी दिल्यामुळे सहाजिकच आधीचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुमानेंबद्दल मतदारसंघात नाराजी होती. त्याचा फटका बसू नये म्हणून हा बदल करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी यांच्यात लढत होणार असली तरी दोन्ही घटकांसमोर किशोर गजभिये यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राजू पारवे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अजून ते मतदारसंघातील शिवसेनेत पुरेसे रुळलेले नाही. त्याचबरोबर तुमाने गटाची नाराजीही त्यांना दूर करणे भाग आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतील यावर त्यांचे विजयी होणे अवलंबून राहणार आहे.

मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. दोन्ही बाजूंनी दिग्गजांच्या सभा आयोजित होत आहेत. त्यात किशोर गजभिये यांनीही आपली प्रचार आघाडी सक्रिय केलेली आहे. हे चित्र बघता रामटेक मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होणार हे नक्की आहे. या तिरंगी लढतीत शिंदे शिवसेना आपला मतदारसंघ राखण्यात यशस्वी होते की हातून गेलेला मतदारसंघ परत मिळवण्यात काँग्रेस यशस्वी होते याचा निकाल येत्या १९ एप्रिल रोजी मशीन बंद होणार आहे हे नक्की...

नरसिंह राव यांना दिला होता रामटेकने हात...

या मतदारसंघाचे वैशिष्ट्य असे की, १९८४ मध्ये आंध्र प्रदेशात स्वतंत्र तेलंगणा आंदोलन जोरात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. नरसिंहराव यांना तेलंगणातून निवडणूक लढवणे जरा कठीण जात होते. त्यावेळी रामटेकने त्यांना हात दिला होता. तेलंगणातून पराभूत झालेले नरसिंहराव रामटेकमधून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. १९८४ आणि १९८९ अशा दोन निवडणुकांमध्ये नरसिंह राव रामटेकमधूनच विजयी झाले होते. अर्थात १९९१ च्या निवडणुकीच्या वेळेस राजीव गांधींची हत्या झाली आणि सर्व चित्र बदलले. नंतर पंतप्रधान झाल्यावर हनमकोंडातून विजयी झालेले नरसिंह राव रामटेकला पार विसरले.

काँग्रेसचा होता बालेकिल्ला

अशा या रामटेक मतदारसंघात १९९८ पर्यंत काँग्रेसचाच उमेदवार विजयी होत होता. १९९९ मध्ये सर्वप्रथम शिवसेनेचे सुबोध मोहिते काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून विजयी झाले होते. मोहिते नंतर २००४ मध्ये विजयी झाले. मात्र २००७ मध्ये त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे प्रकाश जाधव विजयी झाले होते. २००९ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसकडे गेला. त्यावेळी काँग्रेसचे मुकुल वासनिक निवडून आले होते.

२०१४ पासून शिवसेनेकडे

२०१४ पासून हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in