रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद

गेल्या तीन महिन्यांपासून श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे जतन व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सध्या मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतिपथावर आहेत. या अनुषंगाने १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत जतन व संवर्धन कामांकरिता मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार...
रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद
Published on

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे जतन व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सध्या मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतिपथावर आहेत. या अनुषंगाने १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत जतन व संवर्धन कामांकरिता मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने जतन व दुरुस्ती कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पुरातत्त्व विभागामार्फत अष्टविनायकातील मंदिरांच्या जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा ठराव झाला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही संबंधित आदेश जारी केले आहेत.

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे थेट दर्शन बंद राहणार आहे.

नित्य पूजा सुरू राहणार

मंदिर दर्शनासाठी बंद असले, तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहतील, असे देवस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in