कराडमध्ये सापडले दुर्मिळ स्टार कासव ; बेवारस आढळल्याने तस्करीचे गुढ वाढले

तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या स्टार कासवाचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
कराडमध्ये सापडले दुर्मिळ स्टार कासव ; बेवारस आढळल्याने तस्करीचे गुढ वाढले

कराड : वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित प्राणी असलेले आणि देशात सर्वाधिक तस्करी होणारे स्टार कासव कराड शहरात बेवारस स्थितीत सापडले आहे. स्टार कासव पाळणे, बाळगणे, सांभाळणे किंवा त्याची विक्री करणे, हा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा गुन्हा मानला जातो. असे असतानाही कराडमध्ये हे दुःसाहस कोणी केले, याचा शोध अद्यापही लागला नसून तो घेतला जाणार का, कि नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवत तो मी नव्हेचचा पवित्र घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतातील अत्यंत दुर्मिळ प्रजाती असलेले हे स्टार कासव शनिवारी १६ रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कराडमधील रविवार पेठेतील काझी वाडा परिसरात बेवारस स्थितीत सापडले. हे कासव कोणीतरी घरी आणले असावे, मात्र याची माहिती वन विभागाला मिळाली तर कारवाई होऊ शकते, या भीतीने नंतर ते जाणून बुजून सोडले असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, हे कासव आढळून आल्याची माहिती तेथील नागरिकांनी वन विभागाला दिल्यानंतर कराडचे वनक्षेत्रपाल, वनरक्षक यांनी हे कासव ताब्यात घेत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या स्टार कासवाचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

कासवांच्या अनेक प्रजाती आहेत. अंधश्रद्धेपोटी व गैरसमजुतीतून औषधे, धार्मिक विधी करणे या कारणांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणात कासवाची तस्करी केली जाते. स्टार कासवाच्या पाठीवर पिवळ्या आणि काळ्या रंगाची सुंदर आकृती असते. हे चित्र एका पिरॅमिडसारखं दिसतं. त्यांचं सौंदर्य पाहूनही काही लोक या कासवांची तस्करी करतात. घरासाठी शुभ आणि पैशांचा पाऊस पाडणारा प्राणी म्हणून अनेक घरांत छुप्या पद्धतीने पाळण्यात येणाऱ्या स्टार कासवाच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी जाहीर झाली आहे. स्टार कासव हा भारतातील सर्वाधिक तस्करी होणारा आणि वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित वर्गातील प्राणी आहे.संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीत या कासवाला संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचं आयुष्य २५ ते ८० वर्षांमध्ये असते तर त्याची लांबी १० ते ३८ सेंटिमीटरपर्यंत असू शकते.तसंच त्यांचं वजन १ ते ६ किलोपर्यंत असू शकतं.भारताता छोट्या आणि मध्यम आकाराचे स्टार कासव आढळतात.१५ ते २५ हजार रुपयांपर्यंत स्टार कासवाची विक्री होत असते असे सांगितले जाते.

अंधश्रद्धेतून दुर्मिळ प्रजाती धोक्यात

भारतीय स्टार कासवाच्या अनुषंगाने सर्वत्र अनेक अंधश्रद्धा व गैरसमजुती आहेत. स्टार कासव घरी असणे शुभ मानले जाते. ते तुमच्याजवळ असेल तर तुमच्याइतके भाग्यवान कोणी नाही, अशा घरावर पैशाचा पाऊस पडतो, अशी अंधश्रद्धा आहे. यासह विविध कारणांसाठी स्टार कासवाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. भारतीय स्टार कासव ही एक दुर्मिळ प्रजाती असून या प्रजातीस कोरडे, रेताड, खडकाळ हवामान लागते. गवत, फळे, फूल आणि झाडांची पाने असा त्यांचा आहार असतो. हे कासव भारतात गुजरातमधील कच्छ, राजस्थान, ओरिसा, मध्य महाराष्ट्र अशा ठराविक ठिकाणी सापडते

logo
marathi.freepressjournal.in