धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं? 'या' उमेदवाराच्या एन्ट्रीनं परळी विधानसभेत नवा ट्विस्ट

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राजाभाऊ फड परळी निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळं धनंजय मुंडेंना निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.
धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं? 'या' उमेदवाराच्या एन्ट्रीनं परळी विधानसभेत नवा ट्विस्ट
Published on

बीड: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकिय पक्षांनी आपलं लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केलं आहे. यंदा बीड लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. या पराभवानंतर भाजपनं पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन महायुतीसाठी ही निवडणूक सोपी करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळं धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असणार हे निश्चित झालं आहे. दरम्यान महायुतीतील घटक पक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राजाभाऊ फड परळी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं कळतंय. स्वतः राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं राजाभाऊ फड निवडणूक लढवल्यास धनंजय मुंडेंसाठी ही डोकेदुखी ठरू शकते.

कोण आहेत राजाभाऊ फड?

राजाभाऊ फड हे राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष असून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. राजाभाऊ फड यांची नेत्या पंकजा मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख आहे. त्यामुळे त्यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळं राजाभाऊ फड विधानसभेच्या रिंगणात उभे राहिल्यास धनंजय मुंडेंना मोठा फटका बसू शकतो.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंडे बंधु-भगिनीमध्ये सामना रंगला होता. या हाय वोल्टेज सामन्यात भाजपच्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. अजित पवार गट महायुतीत दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामाध्यमातून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सामना होऊन महायुतीला फटका बसू नये, याची काळजी घेण्यात आली आहे. परंतु त्यानंतर ता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. त्यामुळं महायुतीचं आणि धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in