वडगाव हवेलीच्या सिद्धनाथाची आज रथयात्रा ;यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाची जय्यत तयारी पूर्ण

यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहनही राजेंद्र जगताप व सचिन चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.
वडगाव हवेलीच्या सिद्धनाथाची आज रथयात्रा
;यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाची जय्यत तयारी पूर्ण
PM

कराड : कराडपासून जवळच असलेल्या वडगांव हवेली (ता. कराड) येथील ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची रथयात्रा बुध. १३ रोजी होत आहे. काळाच्या ओघात यात्रेचे स्वरूप बदलत असताना वडगांव हवेली गावच्या सिद्धनाथ रथ यात्रेला मात्र वेगळाच इतिहास आणि परंपरा आहे. या यात्रेचा संपूर्ण मान गावातील बारा बलुतेदार मंडळींना विभागून दिला आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही यात्रेसाठी मंदिराची रंगरंगोटी, सजावट केली आहे. पाझर तलावाच्या निसर्गरम्य परिसरात असलेले सिध्दनाथ मंदिर सर्वाचे आकर्षन ठरत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने यात्रेची जय्यत तयारी केली आहे.

 बुधवार व गुरुवार असे दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेची ओढ भाविकांना दिवाळीपासूनच लागते. बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याला संपूर्ण गावासह श्री सिध्दनाथ मंदिरामध्ये परंपरेनुसार घटस्थापना केली जाते. याच दिवशी सिध्दनाथ जोगेश्वरी नवरात्रास (उपवास) प्रारंभ होतो. नवरात्र  काळात मंदिरात दररोज सकाळी  आरती, पुजा - अर्चा काकड आरती, मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू असते. दरम्यान या काळात दररोज श्री सिध्दनाथाची विविध वेशातील पूजा बांधली जाते. त्यानंतर कार्तिक शुक्ल पक्ष १२ म्हणजे तुळशी विवाहादिवशी रात्री १२ वाजणेच्या सुमारास भाविकांच्या उपस्थित श्री सिध्दनाथ जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होतो. यानंतर सुमारे १५ दिवसांनी म्हणजे मार्गशीर्ष शुक्लपक्ष प्रतिपदा म्हणजे देवदिपावली दिवशी देवाची लग्नाची वरात म्हणजे रथोत्सव साजरा केला जातो.

मंदिर सजविण्याची लगबग

दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर रथ व मंदिर सजविण्याची लगबग गावामध्ये गेली आठवडाभर सुरु होती. त्याचबरोबर सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने विशेष परिश्रम घेतले आहेत. या सर्व सोयी पूर्ण झाल्या असून, यात्रेत कोणतीही उणीव राहणार नाही, याबाबत ग्रामपंचातीने सर्व ती तयारी पूर्ण केले असल्याची माहिती गावचे सरपंच राजेंद्र जगताप व व उपसरपंच सचिन चव्हाण यांनी दिली. तसेच यात्रेनिमित्त  भाविक व ग्रामस्थांसाठी दोन मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहनही राजेंद्र जगताप व सचिन चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in