
मुंबई : राज्यात पाणलोट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च असे तीन महिने ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाची ही विशेष मोहीम असून ३० जिल्ह्यांतील १५३० गावांमध्ये ही रथयात्रा नेली जाणार आहे.
राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना आदी २० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत पाणलोट विकास घटक २.० राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत जानेवारीपासून राज्यात पाणलोट रथयात्रा काढण्यात येत आहे.
पाणलोट रथयात्रेस १५ ते २० जानेवारीदरम्यान प्रारंभ होईल. पश्चिम महाराष्ट आणि कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ या तीन प्रदेशात तीन रथ प्रचार करतील. ६० ते ८० दिवस यात्रा चालणार आहे. राज्यात पाणलोटचे १४० प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत १९० गावे असून परिसरातील १५४० गावांमध्ये रथयात्रा जाणार आहे. रथयात्रेदरम्यान माय भारत पोर्टल अपव्दारे हाती माती घेऊन मृद व जल संरक्षणाची गावकऱ्यांना शपथ दिली जाईल.
वृक्ष लागवड करणे, जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती, भूमी जलसंवाद, श्रमदान असे उपक्रम रथयात्रेत होणार आहेत. यात्रेदरम्यान पाणलोट योद्ध्यांची तसेच धरिणी ताई यांची पाणलोट जनजागृती करण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. या मोहिमेतील सहभागांसाठी युवकांची ‘माय भारत’ पोर्टलमार्फत नोंदणी करण्यात येईल. यात्रेत फिरते मोटार चित्रपटगृह असणार असून गावकऱ्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव घेता येणार आहे. यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाईल.
स्वयंसेवी संस्थांच्या सूचनांचा विचार
पाणलोट रथयात्रेचे नियोजन करताना स्वयंसेवी संस्थांच्या सूचना विचारात घ्याव्यात. यात्रेचा प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम बनवावा. अधिक गावांमध्ये रथयात्रा पोहचावी असे मार्ग ठरवण्यात यावेत. रथयात्रेदरम्यान जुन्या पाणलोटाच्या दुरुस्तीचे कामे हाती घ्यावीत. ही मोहीम शासकीय कार्यक्रम न राहता लोकचळवळ व्हायला हवी, अशा सूचना विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.