

रत्नागिरी: तालुक्यातील कोळंबे येथे विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबटयाला (ब्लॅक पँथर) बाहेर काढण्यात वनविभागाला ३६ तासांनंतर यश आले आहे. विहिरीच्या कपारीत दबा धरून बसलेला हा बिबट्या पिंजऱ्यात येण्यास तयार नसल्याने, अखेर विहिरीत टँकरने पाणी सोडून त्याला बाहेर काढण्याची मोहीम फत्ते करण्यात आली.
कोळंबे येथील आंबा बागेतील ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या ब्लॅक पँथरची (बिबट्या) वनविभागाने अनोख्या पद्धतीने सुखरूप सुटका केली. दिनेश भागवत यांच्या बागेतील विहिरीत २१ मार्चला सकाळी सातच्या सुमारास वासराचा पाठलाग करताना बिबट्या पडल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील समीक्षा तोरसकर यांनी वनविभागाला कळवले. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वनविभागाने बचावकार्य सुरू केले. दिवसभर प्रयत्न करूनही विहिरीत बसण्यासाठी सुरक्षित जागा मिळाल्याने बिबट्या पिंजऱ्याकडे येत नव्हता. विहिरीत सुमारे अडीच फूट पाणी असल्याने बिबट्या दगडाजवळ स्थिर बसला होता. वनविभागाचे कर्मचारी सलग ३६ तास डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत होते, पण बिबट्या पिंजऱ्याच्या वाटेलाही जात नव्हता. विहिरीत पाणी अत्यंत कमी असल्याने बिबट्याला कपारीतून बाहेर काढणे अशक्य होत होते.
अखेर वनविभागाने एक वेगळीच शक्कल लढवली. दोन मोठे टँकर मागवून विहिरीत पाणी सोडण्यात आले. जशी पाण्याची पातळी वाढू लागली, तसा कपारीत लपलेला बिबट्या पाण्याच्या भीतीने बाहेर आला आणि त्याचवेळी समोर लावलेल्या पिंजऱ्यात तो अडकला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. कोणतीही दुखापत न होता त्याची सुटका करण्यात आली. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रत्नागिरीत आणण्यात आले. हा बिबट्या नर असून त्याचे वय साधारण ३ वर्षे आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला यामुळे पूर्णविराम मिळाला असून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, ब्लॅक पँथरला बाहेर काढण्यासाठीचे ऑपरेशन वन विभागाचे अधिकारी गिरीजा देसाई, अतिरिक्त वन अधिकारी प्रियांक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक वन अधिकारी प्रकाश सुतार, नानू गावडे, विराज संसारे, दिवा कोळेकर, विक्रम कुंभार, श्रावणी पवार, नमिता कांबळे, कोळंबेतील पोलीस पाटील यांनी केले.