

रत्नागिरी : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेचा समुद्रकिनारा जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबर रोजी अचानक बंद केला होता. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या आदेशाने शनिवारपासून गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
बीच बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत व जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावरील सद्यस्थितीची माहिती देत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीचे सहा जीव रक्षक दोन सत्रांत कार्यरत असल्याचे सांगितले. जयगड पोलीस ठाण्यांतर्गत होमगार्डही तैनात असून, पर्यटकांना आवश्यक सूचना दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच सुरू करण्याचे आदेश दिले.
स्वच्छता राखण्याच्या सूचना
गणपतीमुळे समुद्रकिनारा खुला करताना स्वच्छता राखण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी नागरिकांना दिल्या. किनारा पुन्हा सुरू केल्याबद्दल ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.