

शेखर धोंगडे/कोल्हापूर
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती येथे शनिवारी रत्नागिरी हापूस आंब्याची यंदाच्या हंगामातील पहिली अधिकृत आवक झाली. हंगामाच्या प्रारंभीच झालेल्या लिलावात एका पेटीला तब्बल ६,०२१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्याने आंबा उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बेर्डे बंधू या शेतकऱ्यांकडून पाच पेट्यांची आवक झाली होती. स्थानिक व्यापारी आकाश तोडकर यांच्या आडत दुकानात सकाळी लिलाव प्रक्रिया पार पडली. १५ नग आंब्यांच्या पहिल्या पेटीची बोली ४,५०० रुपयांपासून सुरू झाली आणि चढाओढीनंतर प्रसाद वळंजू यांनी ६,०२१ रुपयांना ती पेटी खरेदी केली.
यंदा हवामानातील अनियमित बदलांचा फटका आंबा पिकाला बसल्याने फळधारणा अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. फुलोरा भरपूर असतानाही उत्पादनात घट झाल्याने बाजारात सुरुवातीची आवक मर्यादित राहिली असून दरात तेजी टिकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गतवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच हापूसची चांगली आवक झाली होती; मात्र यंदा फेब्रुवारी अखेरीस पहिली खेप बाजारात दाखल झाली आहे. हंगाम पुढे सरकल्यानंतर आणि आवक वाढल्यानंतर एप्रिलच्या मध्यापासून दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी हापूसला राज्यभरातून मोठी मागणी असल्याने आगामी काळात इतर प्रमुख बाजार समित्यांमध्येही अशाच प्रकारे चढ्या दराने व्यवहार होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील आंबा उत्पादकांसाठी ही हंगामाची आशादायी सुरुवात मानली जात आहे.