

रत्नागिरी : ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आंबा व काजू बागांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ) यांच्यातर्फे २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधीसाठी कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. बागायतदारांनी शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात, असे आवाहन सहयोगी संशोधन संचालक वैभव शिंदे यांनी केले आहे.
सध्या बहुतांश आंबा बागांमध्ये नवीन पालवी फुटली असून, काही ठिकाणी पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे. २३ ऑक्टोबर रोजी झालेला पाऊस आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे कोवळ्या पालवीवर तुडतुडे, करपा रोग आणि शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांमुळे पालवीवर चिकटा निर्माण होऊन काळ्या बुरशीचा प्रादुर्भावही होऊ शकतो.
आंबा बागांसाठी उपाययोजनेची गरज
तुडतुडे नियंत्रणासाठी प्रति १० लिटर पाण्यात डेल्टामेथ्रीन ९ मिली मिसळून फवारणी करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी थायोफिनेट मिथाइल १० ग्रॅम, तर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास टोलफेनपायरॅड २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. फवारणीतील औषध पालवीवर व्यवस्थित चिकटून राहण्यासाठी आणि सर्वत्र पसरण्यासाठी द्रावणात स्टिकर व स्प्रेडर मिसळावे. नवीन पालवीचे पोषण होऊन ती सशक्त आणि लवकर जून होण्यासाठी ०:०:५० आणि १३:०:४५ ही विद्राव्य खते स्वतंत्रपणे प्रत्येकी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावीत.
काजू बागायतदारांनाही सल्ला
काजूच्या वेंगुर्ला-१, वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-९ आणि वेंगुर्ला-१० या वाणांना नवीन पालवी येत आहे. वेंगुर्ला-१ व वेंगुर्ला-१० या वाणांच्या काही झाडांवर मोहर दिसू लागला आहे. ढगाळ वातावरणात ढेकण्या किडीपासून संरक्षणासाठी नवीन पालवीवर प्रति १० लिटर पाण्यात लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ६ मिली मिसळून फवारणी करावी. तसेच झाडांच्या बुंध्याजवळ जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय किंवा जैविक आच्छादन (मल्चिंग) करावे, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.