

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटच्या उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना शनिवारी सायंकाळी झालेल्या हलक्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरी शहरात पावसाचा शिडकावा झाला, तर संगमेश्वर तालुक्यातील देवरुखसह काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी भात कापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
रत्नागिरी शहरात शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात हलक्या सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांची या पावसामुळे काहीशी तारांबळ उडाली. पावसाअभावी वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, हा पाऊस शेतीसाठी कितपत फायदेशीर ठरणार आणि भातपिकावर त्याचा नेमका काय परिणाम होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला असला, तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि शेतीवरील संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे परतीचा पाऊस पुढील काळात कसा राहणार? याकडे नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात पावसाचे स्वरूप कसे राहते? यावर शेतीच्या नुकसानीची आणि नागरिकांना मिळणाऱ्या दिलाशाची स्थिती अवलंबून असेल.
जनजीवन विस्कळीत
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले.
भात कापणीच्या काळात शेतकऱ्यांची चिंता
जिल्ह्यातील अनेक भागांत भातपीक कापणीच्या उंबरठ्यावर आहे. काही शेतकऱ्यांनी भात कापणीही केली आहे. अशा वेळी परतीच्या पावसाने जोर धरल्यास कापणी केलेले पीक भिजण्याची तसेच उभ्या भातपिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्षभराच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या पिकाला पावसाचा फटका बसू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.