रत्नागिरी: विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला झटका; POCSO अंतर्गत दोषत्वावर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील नराधम शिक्षकाला उच्च न्यायालयाने झटका दिला.
रत्नागिरी: विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला झटका; POCSO अंतर्गत दोषत्वावर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील नराधम शिक्षकाला उच्च न्यायालयाने झटका दिला. तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपी रमेश जाधव याला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेवर न्यायमूर्ती किशोर संत यांनी शिक्कामोर्तब केले.

आरोपी रमेश जाधवने शिकवत असतानाच वर्गातच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. यादरम्यान त्याने वर्गात केवळ मुलींना ठेवले आणि मुलांना बाहेर पाठवले होते. याप्रकरणी पोलिसांनी २४ डिसेंबर २०२१ रोजी जाधवविरुद्ध भारतीय दंड संहितेसह पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. नंतर आरोपपत्र दाखल करून खटला चालविण्यात आला.

पीडित मुलींपैकी एका मुलीच्या आईने नराधम जाधवच्या कृत्याबद्दल मुलींनी सांगितलेल्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने न्यायालयात साक्ष दिली होती. त्याआधारे रत्नागिरीच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी जाधवला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात जाधवने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या अपिलावर न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने तक्रारदार महिलेची साक्ष आणि पीडित मुलींनी नोंदवलेला जबाब व इतर पुरावे विश्वासार्ह मानत शिक्षकाने तीन अल्पवयीन मुलींचे केलेले लैंगिक शोषणाचे कृत्य अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त करताना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.

logo
marathi.freepressjournal.in