
कराड : प्रामुख्याने मुंबई, पुण्यात होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांचे लोण आता साताऱ्यासारख्या ग्रामीण भागात येऊन पोहोचले असून साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या कास पठारावरील मौजे ऐकिव ता. जावली जि. सातारा गावच्या हद्दीतील जय मल्हार या हॉटेलमध्ये झालेल्या अशाच एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड झाला असून सोशल मीडियावर या रेव्ह पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या शनिवारी ७ डिसेबर रोजी रात्रभर या रेव्ह पार्टीचा नंगानाच हॉटेल जय मल्हारमध्ये सुरूच होता पण या रंगेल पार्टीचा शेवट बेरंगात होऊन तेथे हाणामारी, फोडाफोडी इतकेच नव्हे तर जीवघेणे सशस्त्र एकमेकांवर हल्ले होऊन काही जखमी झाल्याची घटनाही घडली. मात्र घटना घडल्यानंतर तब्बल पाच दिवसांनंतर गुरुवारी याबाबतचा गुन्हा मेढा, ता जावळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दलही शंका उपस्थित करणारी चर्चा सध्या सातारा परिसरात रंगू लागली आहे.
याप्रकरणी प्रतिक बापुराव दळवी (२१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रेयस श्रीधर भोसले, सोन्या जाधव,रोहन जाधव, अमर पवार, समीर सलीम कच्छी व इतर सर्व साथीदार यांच्याविरोधात मेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र संशयित फरार झाले असल्याने पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
साताऱ्याच्या कास पठारावरील मौजे ऐकिव ता. जावली जि. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल जय मल्हारमध्ये शनिवारी ७ रोजी बारबालांसह आंबट शौकिनांची रेव्ह पार्टी रंगली होती. या हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांना ही रेव्ह पार्टी अदा केली होती. मात्र या रेव्हपार्टीत नंगानाच, धिंगाणा व बिभत्स हावभाव असा रंगेल धुमधडाका सुरू असतानाच अचानक या पार्टीचा बेरंग होत हाणामारी, सशस्त्र जीवघेणे एकमेकांवर हल्ले असा प्रकार सुरू होऊन यामध्ये झालेल्या भांडणात ३ जण जखमी झाले आहेत.
जय मल्हार हॉटेलवर झालेल्या या रेव्ह पार्टीत बारबाला देखील नाचवल्या गेल्या असून पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे, बारबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशलमिडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, तीन जण जखमी झाल्याने मेढा पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कास परिसरातून जोर धरू लागली आहे.