निवडणुकीतून माघारीमुळे एकनाथ खडसेंवर टीका; आरोप निराधार असल्याचा खडसेंचा खुलासा

निवडणुकीतून माघारीमुळे एकनाथ खडसेंवर टीका; आरोप निराधार असल्याचा खडसेंचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांची उमेदवारी देण्याबाबत घोषणा केली होती. मात्र...

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांची उमेदवारी देण्याबाबत घोषणा केली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभेची ही निवडणूक लढवता येणार नसल्याचे खडसे यांनी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीतूनच त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

पक्ष अडचणीत असताना खडसे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याचा आरोप माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला, तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सुनेला उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार व उद्धव ठाकरे या दोघांचाही विश्वासघात केल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून एकनाथ खडसे यांना अखेर रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन काही महिन्यांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे शरद पवार यांना कळवले होते. त्यामुळे मी पक्षाला अंधारात ठेवले असे म्हणता येणार नाही, असा खुलासा करावा लागला.

रावेरमध्ये भाजपने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून रक्षा खडसे यांच्याविरोधात लढण्यासाठी शरद पवार गटाने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव जाहीर करत ही निवडणूक लढवण्याची खडसे यांना विनंती केली होती. मात्र, खडसेंना हदयविकाराचा त्रास असून मध्यंतरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. अजून दोन ब्लॉक्स काढणे बाकी असल्याने डॉक्टरांनी निवडणुकीच्या दगदगीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा स्थितीत त्यांची कन्या, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा पक्षातून व्यक्त केली गेली. मात्र, रोहिणी खडसेंना लोकसभा निवडणुकीत रस नसून त्या विधानसभा निवडणूक लढवू इच्छितात, असे राहिणी खडसे यांनीच जाहीर केले. असे असताना माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पक्ष अडचणीत असताना खडसेंनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असा आरोप खडसेंवर केला, तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी घराणेशाहीचा आरोप करत सुनेला उमेदवारी मिळावी आणि निवडणूक सोपी जावी म्हणून माघार घेत शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

याला उत्तर देताना खडसे यांनी उमेदवारीस नकार का दिला हे पक्षनेतृत्वाला अगोदरच सांगितले असून त्यांनी काही विचारल्यास त्यांना उत्तर देईन. गल्लीतल्या नेत्यांना का उत्तर द्यावे, असा सवाल केला. तसेच एकनिष्ठतेबाबत शरद पवारांची साथ सोडणाऱ्या संजय पवारांनी बालू नये, असा टोला लगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in