रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप

रविकांत तुपकर गेल्या अनेक दिवसांपासून पक्षविरोधी कारवाया करत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय.
रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप
Published on

रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. रविकांत तुपकर गेल्या अनेक दिवसांपासून पक्षविरोधी कारवाया करत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर जाधव तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये बैठक झाली. त्यामध्ये रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जालिंदर जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर बैठक आयोजित केली आहे, संघटनेला याबाबतची कोणतीही माहिती नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये एकाही ऊस परिषदेला रविकांत तुपकर हजर राहिले नाहीत. एकाही कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित नव्हते तसेच स्वाभिमानीच्या एकाही आंदोलनात ते आलेले नाहीत. आत्तापर्यंत चार वर्ष आम्ही वाट पाहिली, आता आम्ही वाट पाहू शकत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि रविकांत तुपकर यांचा आजपासून कोणताही संबंध नाही."

जालिंदर जाधव पुढे म्हणाले की, "लोकसभेत राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतरही आम्ही काम करत आहोत. रविकांत तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही. त्यांना संघटनेनं लाल दिवा दिला, पद दिलं. एकदा पक्ष सोडला आणि पुन्हा माघारी आले. ते ऊस परिषदेसही उपस्थित राहिले नाहीत. लोकसभेमध्येही आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच काम केलं. तरीही ते राजू शेट्टी यांच्या विरोधात बोलत राहिले. तुपकर यांच्यामुळं चळवळीचं नुकसान होत आहे."

logo
marathi.freepressjournal.in