
लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही, असे सांगत पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज (दि.१०) अखेर काँग्रेस पक्षाची साथ सोडली.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज संध्याकाळी बैठक होणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचेही धंगेकर यांनी पत्रकर परिषदेत जाहीर केले.
शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणती ऑफर?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्याअनुषंगाने तुम्ही एकनाथ शिंदेंकडे काय मागणी केली, राजकीय भविष्यासाठी एकनाथ शिंदेंकडून शब्द काय देण्यात आला आहे का अशी थेट विचारणा त्यांना पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्यावर, मी विधान परिषद , विधानसभा किंवा म्हाडा मागितल्याच्या बातम्या आल्या. पण, असं मी शिंदेंना काहीही मागितलेलं नाहीये. मी कोणत्याही पक्षात असलो तरी माझ्याकडे मानवता धर्म आहे. जात-पात न मानणारा मी कार्यकर्ता आहे, असे धंगेकर यांनी स्पष्ट सांगितले. पुढे बोलताना, आज संध्याकाळी मी शिंदे साहेबांशी बोलणार आहे, जो काय निर्णय होईल तो संध्याकाळी होईल, असेही ते म्हणाले.
सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत-
कोणताही निर्णय घेणे प्रचंड कठीण असते. ज्या पक्षासोबत तुम्ही १०-१२ वर्षे काम करतात, त्याठिकाणी कौटुंबिक नाते निर्माण होत असते. लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीतही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी ताकद मागे उभी केली होती. पराभव झाला ही बाब वेगळी, पण सर्वानीच आपल्यावर खूप प्रेम केलं. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होतंय, शेवटी आपण माणूस आहोत. मी माझ्या मतदारांशी चर्चा केली. कार्यकर्तेही काही दिवसांपासून ऐकत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की आता आमची कामं कोण करणार? आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा कामे करु शकत नाही. अशावेळेस मध्यंतरी कामानिमित्त एक-दोन वेळेस एकनाथ शिंदेंना भेटलो होतो. उदय सामंत यांच्याशीही बोलत होतो. त्यानी एकदा आमच्यासोबत काम करा असं सांगितलं होतं. नंतर धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या चालल्या होत्या. वर्षानूवर्ष ज्या भागात काम करतोय...तिथल्या नागरिकांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की तुम्ही सत्ता असल्याशिवाय काम होत नाही. काँग्रेसचा आमदार असतानाही शिंदेंनी काही कामांमध्ये सहकार्य करत मदत केली होती. ज्यांचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये पोहोचलाय त्यांच्यासोबत काम करायला हरकत नाही अशी मानसिकता झाली आणि आज सर्वांशी चर्चा करुन शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असेही धंगेकर यांनी यावेळी सांगितले.