Pune : शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांना न्यायालयाचे समन्स; ७ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश

शिवसेना (शिंदे गट) चे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने समन्स बजावले असून, ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : शिवसेना (शिंदे गट) चे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने समन्स बजावले असून, ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे समन्स समीर पाटील यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी जारी करण्यात आले आहेत. धंगेकर यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

समीर पाटील यांनी आरोप केला आहे की, रवींद्र धंगेकर यांनी आमच्यावर केलेले आरोप खोटे आणि बेबुनियाद आहेत. त्यांनी आपल्या आरोपांचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही, तसेच माफीही मागितलेली नाही. नोटिशीला त्यांनी उत्तर दिले नाही, म्हणून आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

पाटील यांनी धंगेकर यांच्याकडून ५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि जाहीर माफीची मागणी केली आहे. “जर त्यांनी आपल्या आरोपांचा पुरावा दिला नाही, तर त्यांना नुकसान भरपाई भरावी लागेल आणि माफी मागावी लागेल,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यासाठी कोर्टाने धंगेकर यांना वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

"आम्ही कायदेशीर मार्गाने न्यायालयात उत्तर देऊ. दिवाळीचा सण आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे नोटिशीला उत्तर देण्यात विलंब झाला.त्यांनी स्पष्ट केले की, समन्स आल्यावर आम्ही न्यायालयात जाऊन आपली भूमिका मांडू." - रवींद्र धंगेकर, पुणे महानगर प्रमुख शिवसेना (शिंदे गट)

logo
marathi.freepressjournal.in