रविंद्र वायकरांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखावं...शिवसेना ठाकरे गटाची मागणी

रविंद्र वायकरांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखावं...शिवसेना ठाकरे गटाची मागणी

अमोल कीर्तीकर यांना एकदा नव्हे, दोन वेळा विजयी घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर रिजेक्टेड बॅलेट पेपरची मतं मोजून वायकरांना बेकायदेशीरपणे विजयी घोषित केलं गेलं, असं संजय राऊत म्हणाले.
Published on

लोकसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास दोन आठवडे झाले तरीही उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालावरून सुरु असलेलं महाभारत थांबायचं नाव घेत नाही. या मतदारसंघामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या रविंद्र वायकर यांचा केवळ ४८ मतांनी विजय झाला, तर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. परंतु या निकालावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. वायकर यांच्या विजयासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला जातोय. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, वायकर यांना चुकीची पद्धतीनं विजयी घोषित करण्यात आलं आहे. त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखलं जावं, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

कीर्तीकरांना दोनदा विजयी घोषित करण्यात आलं...

संजय राऊत म्हणाले की, "उत्तर-मध्य मुंबईचा निकाल वादग्रस्त बनलेला आहे. अमोल कीर्तीकर यांना एकदा नव्हे, दोन वेळा विजयी घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर रिजेक्टेड बॅलेट पेपरची मतं मोजून वायकरांना बेकायदेशीरपणे विजयी घोषित केलं गेलं. निवडणूक अधिकारी वंदना सुर्यवंशीला कुणाचातरी फोन येत होता. आणखी एक अधिकारी दिनेश गुरव, ज्याच्याकडे असा फोन होता, ज्याच्या माध्यमातून ईव्हीएम अनलॉक केलं जाऊ शकतं किंवा छेडछाड केली जावू शकते. तो फोन घेऊन आत आला. तोच फोन घेऊन शिंदे गटाच्या उमेदवाराचा नातेवाईक आत घेऊन फिरत होता. तरीही वंदना सुर्यवंशी यांनी हरकत घेतली नाही. त्यानंतर वायकर यांना चुकीच्या पद्धतीनं विजयी घोषित केलं गेलं. ते हरलेले आहेत.

त्या अधिकाऱ्याला सुट्टीवर का पाठवलं?

आता तो फोन जप्त केला गेला आहे. आता वनराई पोलीस स्टेशनमध्ये तो फोन बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. तेथील पोलीस अधिकारी राजभर हे तपास करत होते, त्यांना सुट्टीवर पाठवलं आणि त्याठिकाणी नवा अधिकारी आणून बसवला. एक निवृत्त पोलीस अधिकारी सातारकर सातत्यानं चार दिवसांपासून वनराई पोलीस स्टेशनमध्ये येत होता. ते कुणाचे नातेवाईक आहेत. काय डील करण्याचा प्रयत्न झाला? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

वायकरांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखावं..

देशातील असे किती मतदारसंघात आहेत, जिथं १०० ते १००० मतांचा फरक आहे, अशा सर्व ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून निकाल आपल्या बाजून वळवण्याचा प्रयत्न झाला. मुंबईतील उत्तर -मध्य मतदारसंघ हा त्याचं उदाहरण आहे. हा निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्यामुळं आमची मागणी आहे की रविंद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखलं जावं.

आम्ही कोर्टात जाणार...

"आम्ही निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सर्व मार्ग अवलंबणार आहोत. उत्तर पश्चिममध्ये आमचाच उमेदवार विजयी झालाय आणि ते कोर्टाच्या माध्यमातून सिद्ध होईल, याविषयी आमच्या मनात शंका नाही."

शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?

एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का? त्याला काय कळतं. मतदानामध्ये किती पैसे वाटले, हा विषय असेल तर मी त्याच्याशी बोलेन. खोक्यांच्या गोष्टी तुम्ही बोला, टेक्निकल गोष्टींवर बोलू नका. ईव्हीएम म्हणजे ५० कोटींचं खोकं नाही. हे वेगळं खोकं आहे. त्याच्यामुळं देशाची लोकशाही बनते आणि बिघडते.

मंत्रिपद का मिळालं नाही, याचं राणेंनी चिंतन करावं...

नारायण राणे यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली. "हे महाशय फक्त ४८ हजार मतांनी निवडून आले. पैसे वाटून...त्यांनी कशाप्रकारे पैसे वाटले, याच्या व्हिडिओ क्लिप्स आहेत. मुंबईत पेपरची लाईन टाकतात, किंवा दुध टाकतात, तशाप्रकारे घराघरात पैशांची पाकिटं टाकली जात होती. ते व्हिडिओ समोर आल्यावर या माणसानं तोंड उघडू नये. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही. यावर चिंतन करावं."

एकनाथ शिंदेच फेक आहेत...

विरोधकांनी लोकसभा निवडणूकीत फेक नॅरेटीव्ह सेट केलं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यांच्या या वाक्याचाही राऊतांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "अहो एकनाथ शिंदेच फेक आहेत. ज्या राज्याचा मुख्यमंत्रीच फेक आहे, त्यांनी फेक नॅरेटीव्हची भाषा करू नये. नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात फक्त फेक नॅरेटीव्ह सेट केली. गेल्या अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यात फेक नॅरेटिव्ह सेट करत होते, त्यांचा पराभव झाला."

logo
marathi.freepressjournal.in