बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम प्रवेशासाठी पुनर्परीक्षा होणार? सीईटी सेलकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा बंधनकारक असल्याचे बहुतांश विद्यार्थ्यांना माहित नसल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी सीईटी सेलने परीक्षेपासून वंचित मुलांसाठी परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतली. मात्र या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा बंधनकारक असल्याचे बहुतांश विद्यार्थ्यांना माहित नसल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी सीईटी सेलने परीक्षेपासून वंचित मुलांसाठी परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीसीए अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे निर्देश सीईटी सेलला दिले आहेत. राज्यात बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीसीए या अभ्यासक्रमासाठी १ लाख ८ हजार ७४१ जागा उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी बंधनकारक केलेली प्रवेश परीक्षा घेण्यासाठी सीईटी सेलने एप्रिलमध्ये अर्ज मागवले. या परीक्षेसाठी ५६ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. तर २९ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेला ४८ हजार १३५ विद्यार्थी बसले.

बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांनी महाविद्यालयांकडे विचारणा केली असता या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी देणे बंधनकारक असल्याचे समजले. त्यामुळे विद्यार्थी, पालक व विद्यार्थी संघटनांनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. त्यातच १ लाख ८ हजार ७४१ जागांपैकी जवळपास ६० हजार जागा रिक्त राहणार असल्याने विद्यार्थी व महाविद्यालयांचे नुकसान होणार आहे. विद्यार्थी हितासाठी अखेर सीईटी सेलने परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

अभ्यासक्रम महाविद्यालये जागा

बीबीए ३०५ ३२२१९

बीबीएम २५ १९६४

बीसीए ४९२ ५०१४१

बीएमएस २४८ २४४०९

एकूण १०७१ १०८७४१

logo
marathi.freepressjournal.in