मुख्यमंत्र्यांसह बंडखोर आमदार नवस फेडायला गुवाहाटीला जाणार

मुख्यमंत्र्यांसह बंडखोर आमदार नवस फेडायला गुवाहाटीला जाणार

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हा संवाद खूप गाजला होता. आता पुन्हा एकदा ‘काय झाडी, काय डोंगार’ची अनुभूती सर्व आमदारांना घेता येणार आहे.

चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतराचे नाट्य घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी सूरतमार्गे गुवाहाटीचा रस्ता पकडला होता. त्याचवेळी शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हा संवाद खूप गाजला होता. आता पुन्हा एकदा ‘काय झाडी, काय डोंगार’ची अनुभूती सर्व आमदारांना घेता येणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी शिंदेसमर्थक आमदार कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यावेळच्या गुवाहाटी दौऱ्यात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतराच्या काळात जी पूजा झाली, त्याचपद्धतीची पूजा पुन्हा एकदा घातली जाणार आहे. ‘महाराष्ट्रात सत्तास्थापन केल्यावर पुन्हा तुझ्या दर्शनाला येईन,’ असे साकडे त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी घातले होते. त्यामुळेच शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा आयोजित करण्यात येत आहे. या दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून प्रवासाचे तसेच अन्य गोष्टींचे काटेकोर नियोजन केले जात आहे.

नवस पूर्ण करणार- बच्चू कडू

बंडखोरीदरम्यान केलेला नवस फेडण्यासाठी आम्ही गुवाहाटीला जाणार आहोत, असे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. आम्ही कामाख्या देवीला नवस केला होता, म्हणूनच हे सरकार स्थापन झाले, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. “आता दिव्यांग मंत्रालय झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे भले झाले पाहिजे. सरकार पडले तरी चालेल, पण शेतकरीराजा अडचणीत येऊ नये,’’ असे साकडे कामाख्या देवीला घालणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in