हिंगोलीत महायुतीत बंड : उमेदवार बदलूनही भाजपचे रामदास पाटील यांचा अर्ज दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रारंभी विद्यमान खासदार असलेले हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांनी प्रचंड विरोध केला आणि कोणत्याही परिस्थितीत हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली पाहिजे, अशी भूमिका घेतली.
हिंगोलीत महायुतीत बंड : उमेदवार बदलूनही भाजपचे रामदास पाटील यांचा अर्ज दाखल

विशेष प्रतिनिधी/मुंबई

हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीतील असंतोष अद्याप शमण्याची चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी भाजपने नकारात्मक सर्व्हेचे निमित्त करून मागे घ्यायला लावली. त्यानंतर बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. परंतु, एवढा बदल करूनही शेवटी नाराज असलेले भाजप नेते रामदास पाटील यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रारंभी विद्यमान खासदार असलेले हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांनी प्रचंड विरोध केला आणि कोणत्याही परिस्थितीत हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे महायुतीत वाद उफाळून आला. भाजपचा हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनाच शिवसेनेची उमेदवारी दिली. त्यामुळे ते प्रचारालाही लागले होते. परंतु, वाढता विरोध पाहून भाजपने शिंदे यांच्यावर दबाव आणून हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घ्यायला लावली. त्यानंतर तिथे बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता हिंगोलीतील परिस्थिती निवळेल, असे वाटत होते. मात्र, भाजपच्या रामदास पाटील सुमठाणकर यांच्या बंडखोरीने चित्र पुन्हा बिघडल्याचे दिसून येत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी रामदास पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. याअगोदर रामदास पाटील यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करीत भाजपला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु तसे न होता हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा तिथे शिंदे गटाचाच उमेदवार दिला गेला. त्यामुळे रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

छातीवर दगड ठेवून निर्णय - पाटील

आम्ही भाजपकडे उमेदवारी मागितली. कारण येथे आमचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान आहे. पण याचा विचार झाला नाही. त्यामुळे मी अक्षरश: छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. आता ही लढाई माझी राहिली नाही, तर कार्यकर्त्यांची झाली आहे. माझा मी वैयक्तिक फॉर्म भरला आहे. आपल्याला पक्षाची भूमिका माहिती नाही, असे भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in