

राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिकमध्ये ९९.८४ टक्के, नांदेडमध्ये ९९.७८ टक्के, जळगावमध्ये ९७.७८ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात ९८.९० टक्के तर सातारा-सांगली विधान परिषदेसाठी तब्बल ९९.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. आता २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक मतदारसंघात ९९.८४ टक्के मतदान; ६१८ मतदारांनी बजावला हक्क, २२ जून रोजी मतमोजणी
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत ९९.८४ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३१९ महिला आणि २९९ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
मालेगाव महापालिकेच्या एका नगरसेवकाव्यतिरिक्त सर्व मतदारांनी मतदान पूर्ण केले. जिल्ह्यातील आठ केंद्रांवर शंभर टक्के, तर एका केंद्रावर ९८.८१ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी येत्या २२ जून रोजी होणार असून त्यानंतर निकाल जाहीर केले जातील.
सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सुरुवातीच्या सत्रात काही केंद्रांवर मतदारांची उपस्थिती कमी होती, मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार दिला नसल्याने चुरस महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर अवलंबून होती.
महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे रिंगणात होते, तर भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांनी माघार घेत दराडे यांना पाठिंबा दर्शवला होता. यामुळे निवडणुकीतील चुरस कमी झाल्याचे चित्र दिसून आले. सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चाळीसगावात नगरसेवकांकडून निवडणुकीवर बहिष्कार
जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी ९७.७८ टक्के मतदानाची नोंद झाली असली, तरी चाळीसगाव शहरातील १३ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक रिंगणातील अपक्ष उमेदवारांवर राजकीय दबाव आणून त्यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. या नगरसेवकांमध्ये अभिषेक देशमुख, सायली जाधव, घृष्णेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, दीपक पाटील, इमरान शेख, विजया पवार, राजश्री राजपूत, स्वाती राखुंडे, राहुल मस्के आणि पुनम अहिरे यांचा समावेश आहे. या प्रक्रियेत आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही किंवा कोणताही संवाद साधला गेला नाही, अशी खंत व्यक्त करत निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून विकासाची अपेक्षा कशी करायची, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
जळगावमध्ये ९७.७८ टक्के मतदान
जळगाव : जळगाव : विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत ९७.७८ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण ६३० पात्र मतदारांपैकी ६१६ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, यामध्ये ३०९ पुरुष आणि ३०७ महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी २ वाजेपर्यंत ९३.८१ टक्के पूर्ण झाली होती. जिल्ह्यातील अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल आणि पाचोरा या पाच मतदान केंद्रांवर शंभर टक्के, भुसावळ केंद्रावर ९८.११ टक्के, तर चाळीसगाव केंद्रावर ७६.१९ टक्के मतदान झाले.
निवडणुकीच्या रिंगणात चार उमेदवार असले तरी, शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी माघार घेतल्यामुळे लढत थेट झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शरद तायडे आणि भाजपचे नंदकिशोर महाजन यांच्यात मुख्य सामना रंगला. सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या असून, २२ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
नांदेड विधान परिषद निवडणुकीत ९९.७८ टक्के मतदान
नांदेड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत ९९.७८ टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर एकूण ४५२ मतदारांपैकी ४५१ मतदारांनी आपला हक्क बजावला. किनवट, हदगाव, नांदेड, कंधार, धर्माबाद, बिलोली आणि देगलूर या सात केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले असून, भोकर केंद्रावर ९७.९२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत ही प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी २२ जून रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे.
निवडणूक रिंगणात तीन उमेदवार असून मतदानासाठी प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली होती. एकूण ४५२ मतदारांमध्ये २२८ पुरुष आणि २२४ महिला मतदारांचा समावेश होता, त्यापैकी सर्व २२८ पुरुष आणि २२३ महिला मतदारांनी मतदान पूर्ण केले. निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध केंद्रांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी वेब कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला होता.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जमा करण्यात आल्या आहेत. या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जाणार असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
संभाजीनगर-जालनात ९८.९० टक्के मतदान, निवडणुकीत मतदानाचा विक्रमी टक्का
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक गुरुवारी शांततेत पार पडली. या मतदारसंघात एकूण ६३७ मतदार असून, त्यापैकी ६३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण ९८.९० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ आणि जालना जिल्ह्यातील चार अशा एकूण १३ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली. भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार इसाक खान सांडू खान यांच्यात झालेली तिरंगी लढत लक्षवेधी ठरली. मतदान केंद्रावरील प्रशासकीय नियोजनातील त्रुटींमुळे शहरातील तहसील कार्यालयात गैरसोयीची घटना घडली.
भाजपच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानासाठी आल्या होत्या. त्यांना चालणे शक्य नसल्याने व्हीलचेअरची मागणी केली होती, परंतु ती उपलब्ध नसल्याने भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड व इतर सदस्यांनी त्यांना खुर्चीवर बसवून मतदान केंद्रापर्यंत नेले. या प्रकारानंतर भाजप सदस्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सातारा-सांगली विधान परिषदेसाठी तब्बल ९९.८९ टक्के मतदान
कराड : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी विक्रमी ९९.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. सातारा व सांगली जिल्ह्यांतील एकूण १२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील विटा-खानापूर केंद्रावर ९८.९७ टक्के मतदान झाले, तर उर्वरित सर्व केंद्रांवर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.
विटा-खानापूर या एकमेव केंद्रावर ९७ पैकी एका मतदाराने मतदान न केल्याने तेथील मतदानाची टक्केवारी ९८.९७ इतकी राहिली. कराड व मलकापूर नगरपालिकांतील सर्व ६० नगरसेवक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ३१ पुरुष व २९ महिला सदस्यांचा समावेश होता.
साताऱ्यात १००, सांगलीत ९९.७६% मतदान
सातारा जिल्ह्यातील एकूण ४७२ मतदारांपैकी सर्व ४७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने तेथे शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. सांगली जिल्ह्यातील ४२३ मतदारांपैकी ४२२ मतदारांनी मतदान केल्याने तेथील मतदानाची टक्केवारी ९९.७६ इतकी राहिली. सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.
'महायुती जिंकणार'
भिवंडी : राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, त्यापैकी ६ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ११ जागांसाठी मतदान होत असून, नाशिकसह सर्वच्या सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील आणि विरोधकांना खातेही उघडता येणार नाही, असा ठाम दावा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या मतदारांची भेट घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
नाशिक, जळगाव, सातारा, सांगली आणि परभणी येथील सर्व राजकीय पेच आता संपुष्टात आले असून, महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.