पेण : मागील १७ वर्षांपासून सुरू असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा जेमतेम ७० टक्के पूर्ण झाला आहे. तोच महामार्गावर असणाऱ्या साइड पट्ट्या भरल्या गेल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. साइड पट्ट्यांवर टाकण्यात आलेल्या लाल मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसात लाल माती मुख्य रस्त्यावर येऊन येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महामार्गावर अनेक मोटारसायकलींचे अपघात होत आहेत.
एकीकडे पेण ते पनवेल या दरम्यानचा रस्ता जवळपास पूर्ण झाला असला, तरी अनेक ठिकाणी खडी, रेती, आणि माती असल्याने मोटारसायकलस्वार घसरून पडत आहेत. तर पेण ते कोलेटी यादरम्यान रस्त्यावर आणि खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी अनेक संघटनांनी मोर्चा आंदोलने केली; मात्र याकडे लोकप्रतिनिधींसह शासनाचे दुर्लक्षित होत आहे. कोकण आणि रायगडचा विकास करणारा हा महामार्ग आजही अपुऱ्या स्थितीत असल्याने येथून प्रवास करणारे आमदार, खासदार तसेच मंत्री यांना या महामार्गाबद्दल कोणतेच सोयरसुतक उरले नाही. नुकतेच पेण तालुक्यातील उचेडे आणि जिते या गावांच्या जवळ दोन मोटारसायकलवाल्यांचा जोरदार अपघात होऊन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात तीन तरुण मृत्यूची झुंज देत आहेत. त्यामुळे सदर अपघात हा महामार्गावरील अपुऱ्या साइड पट्ट्या, अस्ताव्यस्त पसरलेली खडी, रेती आणि रस्त्यावर आलेल्या लाल मातीचे चिखल यामुळे सदरचा महामार्ग हा जीव घेणे ठरत असल्याने या महामार्गाचे अपुरे असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
महामार्गावरून जात असताना लगत असणाऱ्या हॉटेल्स किंवा पेट्रोल पंपामध्ये मोटारसायकल टाकताना आणि बाहेर काढताना खूप अवघड होत आहे. एकीकडे अपुरी साइड पट्टी आणि रस्त्यासाठी टाकणारी लाल माती यामुळे पावसात गाडी चालवणे फार कठीण झाले आहे. रस्त्यावर पावसामुळे चिखल होत असल्याने या चिखलाचा सामना छोट्यांसह मोठ्या वाहनांना सुद्धा करावा लागत आहे. यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन वाहनधारकांच्या समस्या सोडवाव्यात.
- रूपेश म्हात्रे, दुचाकीस्वार
गेली अनेक वर्ष सुरू असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम मार्गी लागणार, तरी केव्हा याच आशेवर कित्येक वर्षे वाहनधारक प्रवास करीत आहेत. सध्या पाऊस सुरू आहे. त्यातच अपुऱ्या अवस्थेत असणाऱ्या साइड पट्ट्या आणि काही ठिकाणी टाकण्यात आलेली लाल माती यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरून अपघात घडत आहेत, याची शासनाने दखल घेऊन होणाऱ्या अपघातांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन लवकरच रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार आहे.
- हरीश बेकाव, सामाजिक कार्यकर्ते