

मुंबई : एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीने नवी योजना आणली आहे. आता कंत्राटी पद्धतीने एसटीमध्येच नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही संधी उपलब्ध होणार असून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना काही ठराविक पदांवर आपली सेवा पुन्हा देता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा करार पद्धतीने विवक्षित कामकाजासाठी करार तत्त्वावर महामंडळ घेणार आहे. मुंबई प्रदेशांतर्गत येणाऱ्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागांसाठी वर्ग ३ पदातील कारागीर - क, सहाय्यक कारागीर व चालक तसेच वर्ग ४ पदातील सहाय्यक व स्वच्छकपदाच्या कामकाजासाठी करार तत्त्वावर घेण्याबाबत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.
या अटीनुसार संधी
इच्छुक सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अर्ज करताना अर्ज करावयाच्या तारखेपर्यंत त्याचे वय ६१ वर्ष व सहा महिन्यांपेक्षा अधिक नसावे. तसेच इच्छुक सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त कर्मचारी हे ज्या विभागातून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झालेले आहेत, त्या विभागातच ते अर्ज करू शकणार आहेत.