मुंबई : गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते मडगाव दरम्यान २ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल आणि मडगाव दरम्यान २ अतिरिक्त गणपती उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने यंदा विशेष गाड्या चालविल्या आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने गणपती उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मडगाव-पनवेल- मडगाव दरम्यान २ विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. ०१४२८ विशेष गाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री १०.१५ वाजता पोहोचेल. तर ०१४२७ विशेष गाडी १५ सप्टेंबर रोजी पनवेल येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल.
या गाड्या पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहेत. तर एक द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, २ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक जनरेटर कार डबे असणार आहेत.
गीतांजली एक्सप्रेसचा एक तास खोळंबा
मुंबई : गीतांजली एक्सप्रेसची आपत्कालीन साखळी खेचल्याने मध्य रेल्वेची टिटवाळा-कसारा लोकल वाहतूक सुमारे एक तास खोळंबली. बुधवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. या कालावधीत अप आणि डाऊन लोकल फेऱ्या उशिराने धावत होत्या. बुधवारी सकाळी ७.३० वाजता टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान गीतांजली एक्सप्रेसची आपत्कालीन साखळी ओढल्याने एक्सप्रेस थांबविण्यात आली. त्यानंतर एक्सप्रेसचा व्हॅक्यूम प्रेशर पाईप फुटल्याने एक्सप्रेस सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला. लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या एका मागे एक थांबल्याने अप दिशेकडील लोकल उशिराने धावत होती. कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा येथे बराच काळ लोकल थांबल्याने नोकरदार वर्गाला प्रचंड फटका बसला. दुरुस्तीनंतर सकाळी ८.३० वाजता गीतांजली एक्सप्रेस मार्गस्थ झाली. मात्र अप आणि डाऊन दिशेकडील लोकल सेवा २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होती.