धार्मिक पर्यटनाला चालना! एसटीसोबत सार्वजनिक-खासगी भागीदारीचा प्रस्ताव

सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित कराव्यात. सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल. यासाठी योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
धार्मिक पर्यटनाला चालना! एसटीसोबत सार्वजनिक-खासगी भागीदारीचा प्रस्ताव
Published on

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित कराव्यात. सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येईल. यासाठी योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर, सर्व खाते प्रमुख यांच्या सह खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील गोरगरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते.

अशावेळी एसटीने खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटनस्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनाचा आनंद लुटता येईल, असे ही ते म्हणाले.

श्रावणापासून शुभारंभ करा!

खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, तुळजापूर- पंढरपूर-अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर-नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावी, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in