नागपूर दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद; विरोधी पक्षांचा सभात्याग : कंपनी मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

विरोधी पक्षाच्या वतीने स्थगन प्रस्ताव स्वीकारून चर्चेची मागणी करण्यात आली.
नागपूर दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद;
विरोधी पक्षांचा सभात्याग : कंपनी मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
PM
Published on

नागपूर : संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह या कंपनीत रविवारी झालेल्या दुर्घटनेचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या वतीने स्थगन प्रस्ताव स्वीकारून चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावल्याने संतप्त झालेल्या विरोधी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या दुर्घटनेप्रकरणी कंपनी मालकावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या नाना पटोले यांनी नागपूरच्या बाजारगाव येथे इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत  झालेल्या स्फोटाचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे. आपल्या राज्यातील कामगार कायदा हा कामगारांच्या हिताचा नसून भांडवलदारांच्या फायद्याचा आहे, अशी जळजळीत टीका पटोले यांनी यावेळी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्यावर बोलण्याची सूचना केली. त्यानुसार प्रश्नोत्तराचा तास संपताच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणी सरकारकडून तत्काळ निवेदन व्हावे, अशी मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी स्थगन प्रस्तावाबाबतच्या सूचना फेटाळल्याने यावर चर्चा झाली नाही. स्थानिक आमदार अनिल देशमुख यांनाही घटनेबाबत सविस्तर भूमिका मांडता आली नाही. नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारल्याने त्याचा निषेध म्हणून विरोधी पक्षाने सभात्याग केला.

तत्पूर्वी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत काम करणारे कामगार प्रशिक्षण घेतलेले हवेत. परंतु, येथे अकुशल कामगार अत्यल्प वेतनावर कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत. ज्याअर्थी, कंपनीकडून सुरक्षा निकषांची पायमल्ली करण्यात आली. तेथे सुरक्षा निकषही पाळले नाही. मुलींना प्रशिक्षण न देता कंत्राटी पद्धतीने कामाला लावण्यात येत असून कंपनीत कर्मचाऱ्यांचे शोषण होत आहे, असा आरोप करत वडेट्टीवार कंपनीच्या मालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा आणि मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षाच्या सभात्यागाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. स्फोटाची गंभीर घटना लक्षात घेऊन सभागृहाचे कामकाज संपण्याच्या आत सरकारच्या वतीने निवेदन करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या निर्णयानंतर पुन्हा तीच चर्चा करून सभात्याग करणे हे काही बरोबर नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in