Pen : पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येचा निषेध, पेण तहसीलदारांना पेण पत्रकारांचे लेखी निवेदन

राज्यातील पत्रकारांचा विविध मार्गाने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही.
Pen : पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येचा निषेध, पेण तहसीलदारांना पेण पत्रकारांचे लेखी निवेदन

समाजात महत्त्वाची भूमिका पार पडणाऱ्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबला जात आहे. पत्रकारांवर हल्ले करत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना सुरू असतानाच रत्नागिरी राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली. सातत्याने वाढणाऱ्या घटनेने पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना वारीसे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले. दरम्यान, उपस्थित सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून घोषणा देत या घटनेचा जाहीर निषेध केला.

महानगर टाइम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवले येथून दुचाकीने जात होते. यावेळी भरगाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा थार गाडीने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. याच भीषण अपघातात वारीसे यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे. हे उघडच आहे. शशिकांत वारीसे यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली. ते कारचालक पंढरीनाथ आंबेडकर होते. सकाळी आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीच्या कार धडकेत पत्रकार वारीसे यांचा मृत्यू होतो. हा योगायोग नसून कट रचून केलेला खूनच आहे. याचा राज्यातील सर्व पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला. आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा. या घटनेची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यातील पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांसह पेण तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.

राज्यातील पत्रकारांचा विविध मार्गाने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा पेण पत्रकारांच्या वतीने देवा पेरवी यांनी दिला. पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या व पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पेण प्रेस क्लब व सर्व पत्रकारांनी तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना निवेदन दिले. यावेळी पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, अरविंद गुरव, नरेश पवार, संतोष पाटील, राजेश कांबळे, स्वप्नील पाटील, विजय मोकल, किरण बांधणकर, प्रशांत पोतदार, राजेश प्रधान, धनाजी घरत, दीपक लोके, प्रकाश माळी, कमलेश ठाकूर, सुनिल पाटील, प्रदीप मोकल आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर सर्व पत्रकारांनी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनाही लेखी निवेदन दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in