अमरावतीतून गवईंची माघार, आनंदराज आंबेडकर यांची उमेदवारी कायम

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या आठ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतर येथील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अमरावतीतून गवईंची माघार, आनंदराज आंबेडकर यांची उमेदवारी कायम

प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीत डाव्या पक्षांचा सहभाग असतानाही माकप आणि भाकपने अनुक्रमे हिंगोली, परभणीत आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी माघार घेतली आहे. तर रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमधून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या आठ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतर येथील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हिंगोलीतून शंकर सिदम तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने परभणीतून राजन क्षीरसागर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने या दोन्ही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी माघार घेतली आहे. रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमधून आपली उमेदवारी कायम ठेवली असून वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होऊ घातलेल्या आठ मतदारसंघात २०४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ३७ तर सर्वात कमी म्हणजे १५ उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांना डमी बॅलेट युनिट वापरता येणार आहे. उमेदवार मतदारांना आपले नाव आणि निवडणूक चिन्ह कुठे आहे हे सांगून आपल्या नावासमोरील बटन दाबण्याचे आवाहन करू शकतात, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची संख्या

  • बुलढाणा- २१,

  • अकोला- १५,

  • अमरावती- ३७,

  • वर्धा- २४,

  • यवतमाळ-वाशिम- १७,

  • हिंगोली- ३३,

  • नांदेड - २३,

  • परभणी- ३४

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in