रा. स्व. संघाचे मदनदास देवी यांचे निधन

अमित शहांसह नड्डा अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार
रा. स्व. संघाचे मदनदास देवी यांचे निधन

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी सोमवारी बंगळुरू येथे निधन झाले. मंगळवारी सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यावेळी गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते.

देवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी शोक व्यक्त केला. त्याचप्रमाणे मंगळवारी होणाऱ्या अंत्यसंस्कारप्रसंगी सरसंघचालक आणि सरकार्यवाह उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शारीरिक अस्वास्थ्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. सोमवारी पहाटे त्यांच्या या संघर्षाचा आपल्या सर्वांसाठी दुःखद अंत झाला आहे. मदनदासजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते.

मदनदास देवी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पुण्यातील मोती बाग येथील संघाच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मदनदास देवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भाजपचे नेते गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक नेतेमंडळी येणार आहेत.

पंतप्रधानांना शोक

मदनदास देवीजी यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्याशी माझे केवळ घनिष्ट संबंधच नव्हते, तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायलाही मिळाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in